निवडक अभंग संग्रह
संकलित Updated: 15 April 2021 07:30 IST

निवडक अभंग संग्रह : निवडक अभंग संग्रह ५

निवडक अभंग संग्रह

निवडक अभंग संग्रह ४   निवडक अभंग संग्रह ६


*
अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ॥१॥
जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन मोहरा आपुलिया ॥२॥
सर्व सुकृतांचे फ़ळ मी लाहीन । क्षेम मी देईन पांडुरंगीं ॥३॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलाची भेटी । आपुलिये संवसाठीं करुनि ठेला ॥४॥
*
पाहे पां ध्वजेचें चिरगुट । राया जतन करितां कष्ट ॥१॥
तैसा मी एक पतित । परि तुझा मुद्रांकित ॥२॥
मसीपत्र तें केवढें । रावो चालवी आपुल्यापाडें ॥३॥
बापरखुमादेविवरदा । सांभाळावें आपुल्या ब्रिदा ॥४॥
*
गुरु हा संतुकुळीचा राजा । गुरु हा प्राणाविसावा माझा । गुरुवीणा देव दुजा । पाहतां नाहीं त्रिलोकीं ॥१॥
गुरु हा सुखाचा सागरु । गुरु हा प्रेमाचा आगरु । गुरु हा धैर्याचा डोंगरु । कदाकाळी डळमळीना ॥२॥
गुरु वैराग्याचें मुळ । गुरु हा परब्रह्म केवळ । गुरु सोडवी तात्काळ । गांठ लिंगदेहाची ॥३॥
गुरु हा साधकांशीं साह्य । गुरु हा भक्तांलागीं माय । गुरु हा कामधेनु गाय । भक्तांघरीं दुभतसे ॥४॥
गुरु घाली ज्ञानांजन । गुरु दाखवी निज धन । गुरु सौभाग्य देऊन । साधुबोध नांदवी ॥५॥
गुरु मुक्तीचे मंडन । गुरु दुष्टांचें दंडन । गुरु पापाचें खंडन । नानापरी वारितसे ॥६॥
काया काशी गुरु उपदेशी । तारक मंत्र दिला आम्हांसी । बापरखुमादेविवरासी । ध्यान मानसीं लागलें ॥७॥
*
नित्य धर्म नाम पाठ । तेचि वैकुंठींची वाट । गुरुभजनीं त्याचा जो विनट । तोचि हरिभक्तु जाणावा ॥१॥
धन्य धन्य धन्य त्यचा वंश । धन्य तो आला जन्मास । तयाजवळीम ह्रुशीकेश । सर्वकाळ नांदतु असे ॥२॥
रामकृष्ण स्मरण जप । तेंचि तयाचें अमूप तप । तो वास करील कोटी कल्प । वैकुंठपीठ नगरीसीं ॥३॥
ज्ञानदेवीं जप केला । हरि समाधीसी साधेला । हरिमंत्रे प्रोक्षिला सर्व संसार निर्धारें ॥४॥
*
मन हें धालें मन हें धालें पूर्ण विठ्ठलचि झालें । अंतर्बाह्य रंगुनि गेलें विठ्ठलाची ॥१॥
विठ्ठल म्हणतां हरलें पाप । पदरीं आलें पुण्य माप । धाला दीनाचा माय बाप विठ्ठलची ॥२॥
विठ्ठल जळीं स्थळीं भरला। रिता ठाव नाहीं उरला । आजि म्यां दृष्टीने पाहिला । विठ्ठलची ॥३॥
ऎसा भाव धुरुनि मनीं । विठ्ठल आणिला निजध्यानीं । अखंड वदो माझी वाणी विठ्ठलची ॥४॥
तो हा चंद्रभागे तीरा । पुंडलीकें दिधला थारा । बापरखुमादेविवरा । जडलें पायीं विठ्ठलची ॥५॥
*
घरदार वोखटें त्यजूं म्हणसी तरी शरीराएवढं जाड । माय बाप वोखटीं त्यजू म्हणसी तरी अहंकार अविद्येचें कोड । बंधु सखे त्यजूं म्हणसी तरी काम क्रोध मद मत्सर अवघड । बहिणी पाठीच्या त्यजूं म्हणसी आशा तृष्णा मायाचे बंडरया ॥१॥
त्यजिलें तें काय कासया म्हणजे सांग पा मजपासीं ऎसें । जया भेणें तू जासी वनांतरा तंव तुजचि सरिसे रया ॥२॥
स्त्री वोखटी त्यजूं म्हणसी तरी कल्पने एवढी भोक्ती । पुत्र अपत्य त्यजूं म्हणती तरी इंद्रियासी नाहीं निवृत्ति । सकळ गणगोत त्यजूं म्हणसी तरी हे अष्टधा प्रकृति । अवघेचि त्यजूं पाहे म्हणसी तरी मनी नाही नजि शांति रया ॥३॥
अवघेचि तुज जवळीं दुमदुमित असतां वरी वरी मुंडसी कां करिसी विटंबना । सहज संतोषें असोनि जैसा तैसा परि तो सदगुरु पाविजे खुणा । आपुले आश्रमी स्वधर्मी असतां सर्वत्र एकुचि जाणा । बापरखुमादेविवरु विठ्ठलु इतुकियासाठीं नेईल वैकुंठभुवना ॥४॥
*
कां सांडिसी गृहाश्रम । कां सांडिसी क्रियाकर्म । कासया सांडिसी कुळींचे धर्म । आहे तें वर्म वेगळेची ॥१॥
भस्मउधळण जटाभारु । अथवा उदास दिगंबरु । न धरीं लोकांचा आधारु । आहे तो विचारु वेगळाची ॥२॥
जप तप अनुष्ठान । क्रिया कर्म यज्ञ दान । कासया इंद्रिया बंधन । आहे तें निधान वेगळेंची ॥३॥
वेदशास्त्र जाणीतलें । आगमीं पूर्ण ज्ञान झालें । पुराणा मात्र धांडोळिलें । आहे तें राहिलें वेगळेंची ॥४॥
शब्दब्रह्में होसी आगळा । म्हणसी न भिये कळिकाळा बोधेंविण सुख सोहळा । आहे तो जिव्हाळा वेगळाची ॥५॥
याकारणें श्रीगुरुनाथु । जंव मस्तकीं न ठेवी हातु । निवृत्तिदास असे विनवितु । तंव निवांतु केविं होय ॥६॥
*
जंववरी रे तंववरी जंबुक करी गर्जना । तंव त्या पंचानना देखिलें नाही बाप ॥१॥
जंववरी रे तंववरी वैराग्याच्या गोष्टी । जंव सुंदर वनिता दृष्टी देखिली नाहीं बाप ॥२॥
जंववरी रे तंववरी मैत्रत्व संवाद । जंववरी अर्थेसि संबंध पडिला नाहीं बाप ॥३॥
जंववरी रे तंववरी युद्धाची मात । जंव परमाईचा पूत देखिला नाही बाप ॥४॥
जंववरी ते तंववरी समुद्र करी गर्जना । जंव अगस्ती ब्राह्मणा देखिलें नाहीं बाप ॥५॥
जंववरी ते तंववरी बाधी हा संसार । जंव रखुमादेविवरा देखिला नाहीं बाप ॥६॥
*
दुर्लभु रे दुर्लभु रे दुर्लभु संसार तुम्ही कां नेणां । आहार निद्रेसाठी दवाडितां माणुसपणा ॥१॥
आड ना विहिरी बावि ना पोखरणी । सरिता ना सागर कल्पतरु रानोरानीं ॥२॥
बावो याची खुण ज्ञानदेवो जाणे । तयाचें करणें तें अधिकचि होणें ॥३॥
*
मोक्ष मेल्यापाठी आम्हांसी होईल । ऎसें जे म्हणतील अतिमूर्ख ॥१॥
दीप गेल्यावरी कैचा जी प्रकाश । झांका झांकी त्यास कासयाची ॥२॥
जंववरी देह आहे तंववरी साधन । करुनिया ज्ञान सिद्ध करा ॥३॥
गृह दग्ध न होतां शिंपीजे उदक । शेखी तो निष्टंक काय कीजे ॥४॥
आहे मी हा कोण करावा विचार । म्हणे ज्ञानेश्र्वर निवृत्तीचा ॥५॥
*
अनुपम्य मनोहर । कासें शोभे पितांबर । चरणीं ब्रिदाचा तोडर । देखिला देवो ॥१॥
योगियाची कसवटी । दावितसे नेत्रपुटी । उभा भिवरेच्या तटीं । देखिला देवो ॥२॥
बापरखुमादेविवरु । पुंडलिका अभंयकरु । परब्रह्म साहाकारु । देखिला देवो ॥३॥
*
पदोपदीं निजपदा गेलें वो । कर्म संचित सकर्म जालें वो ॥१॥
तेथें आपुलें नाठवे कांहीं वो । आप आपणा न सांपडे डाई वो ॥२॥
श्रीगुरुप्रसादें ज्ञान बोधु झाला वो । नव्हे तें ठाउकें पडिलें माय वो ॥३॥
*
दुरुळ अंबुला केला गे बाई । ब्रह्मादिकां तो न पडे ठाई ॥१॥
हालों नये चालों नये । सैरावैरा कांही बोलों नये ॥२॥
अंबुला केला धावे जरि मन । बुडती बेताळीस जाती नाक कान ॥३॥
मागील केलें तें अवघें वावो । बापरखुमादेविवरु विठ्ठल नाहो ॥४॥
*
शरीर वरिवरि कां दंडिसी जंव वारिलें न करी तुझें मन । जळीं नेत्र लाऊनि ठोकती अविंशा लागोनि तैसें नको नको बकध्यान रया ॥१॥
चित्त सुचित्त करी मन सुचित्त करी । नधरी तूं विषयाची सोय । वनीं असोनी वनिता चिंतिसि तरि तपचि वाउगें जाय रया ॥२॥
त्रिकळ स्नान करिसी तिर्थजळीं परि नवजाती मनींचें मळ । तुझियानि दोषें तीर्थ कुश्र्चित जाली जैसी त्या रजकाची शीळ रया ॥३॥
आतां करिसी तरी चौखटची करी त्यासी साक्ष तुझें तुज मन । लटिकेन झकवसी तर्‍ही देव दुर्‍हा होसी बापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण ॥४॥
*
मायविवर्जित जालें वो । माझें गोत तें पंढरिये राहिलें वो ॥१॥
पतिव्रता मी परद्वारिणी । परपुरषेसी व्यभिचारिणी ॥२॥
साचारि चौदा जाली वो । सेखी अठरा घोकुनी राहिलें वो ॥३॥
निवृत्तिप्रसादें मी गोवळी वो । माझा भावो तो विठ्ठलु न्याहाळीं वो ॥४॥
. . .