निवडक अभंग संग्रह
संकलित Updated: 15 April 2021 07:30 IST

निवडक अभंग संग्रह : निवडक अभंग संग्रह ९

निवडक अभंग संग्रह

निवडक अभंग संग्रह ८   निवडक अभंग संग्रह १०


*
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आम्हां नारायण तैशापरी ॥१॥
सर्वभावें लोभ्या आवाडे हें धन । आम्हा नारायण तैशापरी ॥२॥
तुका म्हणे एकविध झालें मन विठ्ठलावांचूनि नेणें दुजें ॥३॥
*
आणिक दुसरें मज नाहीं आतां । नेमिले या चित्तापासुनियां ॥१॥
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनीं । जागृती स्वप्नीं पांडुरंग ॥२॥
पडिलें वळण इंद्रियां सकळां । भाव तो निराळा नाहीं दुजा ॥३॥
तुका म्हणे नेत्रीं केली ओळखण । तटस्थ तें ध्यान विटेवरी ॥४॥
*
आम्ही नामाचे धारण । नेणों प्रकार आणिक । सर्वभावें एक । विठ्ठलाचि प्रमाण ॥१॥
नलगे जाणावें नेणावें । गावें आनंदे नाचावें । प्रेम सुख घ्यावे । वैष्णावांचे सगंतीं ॥२॥
भावबळें घालूं कास । लज्जा चिंता दवडूं आस । पायीं निजध्यास । म्हणवूं दास विष्णुचे ॥३॥
भय नाहीं जन्म घेतां । मोक्षसुख हाणों लाता । तुका म्हणे सत्ता । करुं निकट सेवेची ॥४॥
*
येऊनी संसारीं । मी तो एक जाणॆं हरी ॥१॥
आणिक कांहीं नेणॆं धंदा । नित्य ध्यातसें गोविंदा ॥२॥
काम क्रोध लोभ स्वार्थ । अवघा माझा पंढरीनाथ ॥३॥
तुका म्हणे एक । धणी विठ्ठल मी सेवक ॥४॥
*
कन्या सासुर्‍यासी जाये । मागे परतोनी पाहे ॥१॥
तैसें झालें माझ्या जीवा । केव्हां भेटसी केशवा ॥२॥
चुकलिया माये । बाळ हुरु हुरु पाहे ॥३॥
जीवनावेगळी मासोळी । तैसा तुका तळमळी ॥४॥
*
जन हे सुखाचे दिल्याघेतल्याचे । अतंकाळीचे नाहीं कोणी ॥१॥
झाल्या हीन शक्‍ति नाक डोळे गळती । सांडोनी पळती रांडा पोरे ॥२॥
बाईल म्हणे खर मरता तरी बरें । नासिलें हें घर थुंकोनिया ॥३॥
तुका म्हणे माझे नव्हतील कोणी । तुज चक्रपाणीवाचुनियां ॥४॥
*
फ़िरविलें देऊळ जगामाजी ख्याती । नामदेवा हातीं दूध प्याला ॥१॥
भरियेली हुंडी नरसी मेहेत्याची । धनाजी चाट्याचीं शेतें पेरी ॥२॥
मीराबाईसाठीं घेतो विष प्याला । दामाजीचा झाला पाडेवार ॥३॥
कबीराचे मागीं विणूं लागे शेले । मूल उठविलें कुंभाराचें ॥४॥
आतां तुम्ही दया करा पंढरीराया । तुका विनवी पायां वेळोवेळां ॥५॥
*
धर्म रक्षावया अवतार घेसी । आपुल्या पाळीसी भक्तजना ॥१॥
अंबऋषीसाठीं जन्म सोसियेले । दृष्ट निर्दाळिले किती एक ॥२॥
धन्य तुज कृपासिंधु म्हणतील । आपुला तुं बोला साच करी ॥३॥
तुका म्हणे तुज वर्णितीं पुराणे । होय नारायणे दयासिंधु ॥४॥
*
देव वसे चित्तीं । त्याची घडावी संगती ॥१॥
ऎसें आवडतें मना । देवा पुरवावी वासना ॥२॥
संत जनासवें भेटी । न हो अंगसंगें तुटी ॥३॥
तुका म्हणे जिणॆं । भले संत संघटणें ॥४॥
*
दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा ॥१॥
आतां मज ऎसें करीं । तुझे पाय चित्तीं धरीं ॥२॥
उपजला भावो । तुमचे कृपे सिद्धी जावो ॥३॥
तुका म्हणे आतां । लाभ नाहीं या परता ॥४॥
*
ठाकलोंसे द्वारीं । उभा याचक भिकारी ॥१॥
मज भीक कांहीं देवा । प्रेमभातुकें पाठवा ॥२॥
याचकाचा भार । घेऊ नये येरझार ॥३॥
तुका म्हणे दान । सेवा घेतल्यावांचून ॥४॥
*
लक्ष्मीवल्लभा । दीनानाथा पद्मनाभा ॥१॥
सुख वसे तुझे पायीं । मज ठेवीं तेचि ठायीं ॥२॥
माझी अल्प ही वासना । तूं तो उदाराचा राणा ॥३॥
तुका म्हणे भोगें । पीडा केली धांव वेगें ॥४॥
*
लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऎरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
ज्याचें अंगी मोठेपण । तया यातना कठिण ॥३॥
तुका म्हणॆ जाण । व्हावें लहानाहूनि लहान ॥४॥
*
संसार तापें तापलों मी देवा । करितां या सेवा कुटुंबाची ॥१॥
म्हणऊनि तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ॥२॥
बहुतां जन्मींचा झालों भारवाही । सुटिजे हें नाहीं वर्म ठावें ॥३॥
विढियेलों चोरीं अंतर्बाह्‍यात्कारीं । कणव न करी कोणी माझी ॥४॥
बहु पांगविलों बहु नागविलों । बहु दिवस झालों कासविस ॥५॥
तुका म्हणे आतां धांव घालीं वेगी । ब्रीद तुझें जगीं दीनानाथा ॥६॥
*
आम्हांसाठीं अवतार । मत्स्यकूर्मादि सूकर ॥१॥
मोहें धांवें घाली पान्हा । नांव घेतां पंढरीराणा ॥२॥
कोठें न दिसे पाहतां । उडी घाली अवचिता ॥३॥
सुख ठेवी आम्हांसाठी । दु :ख आपणचि घोटी ॥४॥
आम्हां घाली पाठिकडे । आपण कळिकाळासी भिडे ॥५॥
तुका म्हणे कृपानिधी । आम्हां उतरीं नावेमधीं ॥६॥
*
कई ऎसी दशा येईल माझ्या अंगा । चित्त पांडुरंगा झुरतसे ॥१॥
नाठवुनि देह पायांचें चिंतन । अवसान तें क्षण नाहीं मध्यें ॥२॥
काय ऎसा पात्र होईन लाभासी । कई ह्रुषीकेशी तुष्टतील ॥३॥
तुका म्हणे धन्य मानीन संचित । घेईन नित्यानित्य प्रेमसुख ॥४॥
*
सत्य तूं सत्य तूं सत्य तूं विठ्ठला । कां गा हा दाविला जगदाकार ॥१॥
सांभाळीं आपुली हे माया । आम्हांसी कां भयाभीत केलें ॥२॥
रुप नाहीं त्यासी ठेवियेलें नाम । लटकाची श्रम वाढविला ॥३॥
तुका म्हणे कां गा झालासी चतुर । होतासी निष्ठुर निर्विकार ॥४॥
*
आम्हा घरीं धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ॥१॥
शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन । शब्दे वाटुं धन जनलोका ॥२॥
तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव । शब्देचि गौरव पूजा करुं ॥३॥
*
घेईन मी जन्म याजसाठीं देवा । तुझी चरणसेवा साधावया ॥१॥
हरिनाम कीर्तन संतांचे पुजन । घालुं लोटांगण महाद्वारीं ॥२॥
आनंदे निर्भर असो भलते ठायीं । सुखदु:खा नाहीं चाड आम्हां ॥३॥
आणिक सायास न करी न धरीं आस । होईन उदास सर्वभावें ॥४॥
मोक्ष आम्हा घरीं कामारी ते दासी । होय सांगों तैसी तुका म्हणे ॥५॥
*
बरा देवा कुणबी केलों । नाहींतरी दंभे असतों मेलों ॥१॥
भलें केलें देवराया । नाचे तुका लागे पायां ॥२॥
विद्या असती कांहीं । तरी पडतों अपायीं ॥३॥
सेवा चुकतों संताची । नागवण हे फ़ुकाची ॥४॥
गर्व होता ताठा । जातों यमपंथें वाटा ॥५॥
तुका म्हणे थोरपणॆं । नरक होती अभिमाने ॥६॥
*
रात्रीदिवस आम्हां युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्‍य जग आणि मन ॥१॥
जीवाही आगोज पडती आघात । येऊनियां नित्य नित्य वारुं ॥२॥
तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळें । अवघीयांचे काळें केलें तोंड ॥३॥
*
होईन भिकारी । पंढरीचा वारकरी ॥१॥
हाचि माझा नेमधर्म । मुखीं विठोबाचें नाम ॥२॥
हेचि माझी उपासना । लागे संतांच्या चरणा ॥३॥
तुका म्हणे देवा । करीन ते भोळी सेवा ॥४॥
*
इहलोकींचा हा देह । देव इच्छिताती पाहे ॥१॥
धन्य आम्ही जन्मा आलों । दास विठोबाचें झालों ॥२॥
आयुष्याच्या या साधनें । सच्चिदानंद पदवी घेणें ॥३॥
तुका म्हणे पावटणी । करुं स्वर्गाची निशाणी ॥४॥
*
किती वेळा जन्मा यावों । किती व्हावें फ़जीत ॥१॥
म्हणऊनि जीव भ्याला । शरण गेला विठोबासी ॥२॥
प्रारब्ध पाठी गाढें । न सरे पुढें चालतां ॥३॥
तुका म्हणे रोकडी हे । होती पाहें फ़जीती ॥४॥
. . .