निवडक अभंग संग्रह
संकलित Updated: 15 April 2021 07:30 IST

निवडक अभंग संग्रह : निवडक अभंग संग्रह १५

निवडक अभंग संग्रह

निवडक अभंग संग्रह १४   निवडक अभंग संग्रह १६


*
निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म । निर्धार हें वर्म चुकों नये ॥१॥
निष्काम निश्र्चळ विठ्ठलीं विश्र्वास । पाहों नये वास आणिकांची ॥२॥
तुका म्हणे ऎसा कोण उपेक्षिला । नाहीं ऎकिला ऎसा कोणी ॥३॥
*
काळ सारावा चिंतनें । एकांतवासी गंगास्नानें । देवाच्या पूजनें । प्रदक्षिणा तुळसीच्या ॥१॥
युक्त आहार विहार । नेम इंद्रियांसी सार । नसावी बासर । निद्रा बहु भाषण ॥२॥
परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ॥३॥
देह समर्पिजे देवा । भार कांहींच न घ्यावां । होईल आघवा । तुका म्हणॆ आनंद ॥४॥
*
आलें देवाजीच्या मना । तेथें कोणाचें चालेना ॥१॥
हरिश्र्चंद्र ताराराणी । वाहे डोंबा घारीं पाणी ॥२॥
पांडवांचा साहाकारी । राज्यावरोनि केले दुरी ॥३॥
तुका म्हणे उगेचि राहा । होईल ते सहज पाहा ॥४॥
*
भक्तिप्रेमसुख नेणवे आणिकां । पंडित वाचकां ज्ञानियांसी ॥१॥
आत्मनिष्ठ जरी झाले जीवन्मुक्त । तरी भक्तिसुख दुर्लभ त्यां ॥२॥
तुका म्हणे कृपा करील नारायण । तरिच हें वर्म पडे ठावें ॥३॥
*
आम्ही वैकुंठवासी । आलों याचि कारणासी । बोलिले जे ऋषी । साच भावें वर्ताया ॥१॥
झाडु संतांचे मारग । आडरानीं भरलें जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरलें तें सेवूं ॥२॥
अर्थे लोपलीं पुराणें । नाश केला शब्दाज्ञाने । विषयलोभीं मनें । साधनें बुडविलीं ॥३॥
पिटुं भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । तुका म्हणे करा । जयजयकार आनंदें ॥४॥
*
नको नको मना गुंतुं मायाजाळीं । काळ आला जवळीं ग्रासावया ॥१॥
काळाची ही उडी पडेल बा जेव्हां । सोडविना तेव्हां मायबाप ॥२॥
सोडविना बंधु पाठिची बहिण । शेजेची कामीन दुर राहे ॥३॥
सोडविना राजा देशीचा चौधरी । आणिक सोइरीं भलीं भलीं ॥४॥
तुका म्हणे तुला सोडविना कोणी । एका चक्रपाणिवांचूनियां ॥५॥
*
प्रारब्धेंचि जोडे धन । प्रारब्धेंचि वाढे मान ॥१॥
सोस करिसी वाया । भज मना पंढरीराया ॥२॥
प्रारब्धेंचि होय सुख । प्रारब्धेंचि पावें दु :ख ॥३॥
प्रारब्धेंचि भरे पोट । तुका करीना बोभाट ॥४॥
*
करीं हेंचि काम । नाम जपे राम राम ॥१॥
लागो हाचि छंद । मना गोविंद गोविंद ॥२॥
तुका म्हणे मना । मज भीक द्यावी दीना ॥३॥
*
घेईं घेईं माझें वाचे । गाडे नाम विठोबाचें ॥१॥
तुम्ही घ्यारे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥२॥
तुम्ही ऎका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥३॥
मना तेथें धांव घेईं । राहें विठोबाचे पायीं ॥४॥
तुका म्हणॆ जीवा । नको सोडूं या केशवा ॥५॥
*
आम्ही तेणॆं सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखीं ॥१॥
तुमचें येर वित्त धन । तें मज मृत्तिकेसमान ॥२॥
कंठीं मिरवा तुळसी । व्रत करा एकादशी ॥३॥
म्हणवा हरीचे दास । तुका म्हणॆ मज हे आस ॥४॥
*
रुपीं जडले लोचन । पायीं स्थिरावलें मन ॥१॥
देह भाव हरपला । तुज पाहतां विठ्ठला ॥२॥
कळों नेदी सुखद:ख । तहान हरपली भूक ॥३॥
तुका म्हणॆ नव्हे परती । तुझ्या दर्शनें मागुती ॥४॥
*
सदा नाम घोष करुं हरिकथा । तेणें सदा चित्ता समाधान ॥१॥
सर्व सुख ल्यालों सर्व अलंकार । आनंदें निर्भर डुलतसों ॥२॥
असो ऎसा कोठें आठवचि नाहीं । देहींच विदेही भोगुं दशा ॥३॥
तुका म्हणॆ आम्ही झालों अग्निरुप । लागों नेदूं पापपुण्य अंगा ॥४॥
*
विषयीं विसर पडिला नि:शेष । अंगीं ब्रह्मरस ठसावला ॥१॥
माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥२॥
लाभाचिया सोसें पुढें चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥३॥
तुका म्हणे गंगा सागर संगमीं । अवघ्या झाल्या उर्मी एकमय ॥४॥
*
याजसाठीं केला होता अट्टाहास । शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥
आतां निश्र्चिंतीनें पावलों विसावा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥
कवतुक वाटे झालिया वेचाचें । नांव मंगळाचे तेणें गुणॆं ॥३॥
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळी ॥४॥
*
ब्रह्मरस गोडी तयासी फ़ावली । वासना निमाली सकळ ज्याची ॥१॥
नाहीं त्या विटाळ अखंड सोवळीं । उपाधी वेगळीं जाणिवेच्या ॥२॥
मन हें निश्र्चिळ झालें एके ठायीं । तया उणे काई निजसुखा ॥३॥
तींचि पुण्यवंतें पर‍उपकारी । प्रबोधी त्या नारीं नरलोकां ॥४॥
तुका म्हणॆ त्याचें पायीं पायपोस । होऊनियां वास करीन तेथें ॥५॥
 
. . .