चतुःश्लोकी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

चतुःश्लोकी भागवत : अनुतापयुक्त ब्रह्मदेवाला तप ही दोन अक्षरें ऐकावयास आलीं

मराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.

चित्तशुद्धीशिवाय हरीची भेट नाहीं   तपाचें महिमान

त्या चित्तशुद्धीलागीं जाण । भावें करावें भगवदभजन । कां गुरुदास्य करितां पूर्ण । परब्रह्म जाण पायां लागे ॥८३॥

ते घडावया भगवदभक्ती । तपादिसाधन सुयुक्ती । देव सांगे ब्रह्मयाप्रती । ऐक परीक्षिती नृपवर्या ॥८४॥

एवं कमलासनीं ब्रह्मा आपण । बैसलासे अनुतापें पूर्णं । तंव एकार्णवी निकट जाण । द्वयक्षर वचन द्विवार ऐके ॥८५॥

कोण रुप कोण वर्ण । कैसेपरीचें उच्चारण । त्या अक्षरांचा अर्थ कोण । तेंही लक्षण ऐक राया ॥८६॥

तकारापासुनी पकारावरी । ऐसें ब्रह्मा साक्षात्कारी । त्याची ऐक्यता झडकरी । हो लवकरी विधात्या तुज ॥८७॥

ऐसीं तप ही अक्षरें दोन्ही । परमेष्ठी ऐके कानी । तेचि दोन्ही वेळा करुनी । तपतप हे ध्वनी परिसत ॥८८॥

जैसा परमआप्त येऊनी । हितोपदेश सांगे कानीं । तेवीं आईकोनी दोन्ही । विधाता मनीं चमत्कारला ॥८९॥

हें तपस्वियांचे निजधन । यालागीं ते तपोधन । तपोबळे ऋषिजन । प्रतिसृष्टी जाण करुं शकती ॥९०॥

. . .