चतुःश्लोकी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

चतुःश्लोकी भागवत : भागवताची दहा लक्षणें

मराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.

भागवताची दहा लक्षणें सांगून ब्रह्मदेवानें नारदाला ज्ञानी केले   नारद ब्रह्मज्ञानी झाल्यामुळें ब्रह्मदेवानें आनंदानें त्याला आपली ब्रह्मवीणा दिली

इतर पुराणें जीं असतीं । त्यांची पांचलक्षण व्युत्पत्ति । श्रीमहाभागवताची स्थिती । जाण निश्चिती दशलक्षणें ॥८१०॥

मुख्य भागवताची व्युत्पत्ति । दशलक्षण त्याची स्थिती । ते मी सांगेन तुजप्रती । ऐके परीक्षिती नृपवर्या ॥११॥

सर्ग, विसर्गं, स्थान, पोषण, । ऊती, मन्वंतरें, ईशानुकथन । निरोध, मुक्ती, आश्रय पूर्ण । एवं दशलक्षण भागवत ॥१२॥

दशलक्षणांचें लक्षण । तुज मी सांगेन संपूर्ण । ऐक राया सावधान । लक्षणचिन्ह यथार्थ आतां ॥१३॥

प्रत्येक लक्षणाची व्याख्या

सर्ग बोलिजे संसारातें । विसर्गं म्हणिजे संहारातें । स्थान म्हणिजे वैकुंठातें । पोषण तेथें भगवद्भजन ॥१४॥

कर्म त्यानांव ऊती । चौदामनूंची व्यवस्थिती । यानांव मन्वंतरे म्हणती । दशावतारकीर्ती ईशचरित ॥१५॥

सकळ इंद्रियांच्या वृत्ती । एकाग्र यानांव निरोधस्थिती । निःशेष जेथें विरे वृत्ती । त्यानांव मुक्ती महाराया ॥१६॥

उत्पत्तिस्थितिप्रळ्यांत । ज्या स्वरुपावरी होतजात । स्वरुप अविकारी यथास्थित । त्यानांव निश्चित आश्रय राया ॥१७॥

दोराअंगीं सर्प उपजला । दोरावरी सर्प नांदला । दोरावरी सर्प निजला । तरी दोर स्पर्शला नाहीं सर्पा ॥१८॥

तेवीं वस्तूच्या ठायीं । प्रपंचाची वार्ता नाहीं । तो झाला गेला घडे कांहीं । आश्रय पाही यानांव बापा ॥१९॥

पावावया आश्रयप्राप्ती । भावें करावी भगवदभक्ती । ते भक्तीची निजस्थिती । श्रीव्यासें भागवतीं विशद केली ॥८२०॥

ते भावें करितां भगवदभक्ती । त्या भक्तीची निजस्थिती । भक्तां परमानंदप्राप्ती । परिपूर्णस्थिती ठसावे येथें ॥२१॥

ठसावली जी ब्रह्मस्थिती । ते पालटों नेणे कल्पांतीं । कर्मी अकर्तृत्वाची प्रतीती । नारद निश्चिती उपदेशिला ॥२२॥

. . .