श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक २७ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक २६ वा   श्लोक २८ वा

आचार्यं मां विजानीयान्नावमन्येत कर्हिचित् ।

न मर्त्यबुद्ध्यासूयेत सर्वदेवमयो गुरुः ॥२७॥

जो अंतर्यामी ईश्वरु । जो विश्वात्मा विश्वंभरु ।

जो अनंत अपरंपारु । तो मी श्रीगुरु शिष्याचा ॥९७॥

गुरुनामाची जे मातु । तो मी साचार भगवंतु ।

देखोनि भजनभावार्थु । पुरवीं मनोरथु शिष्याचा ॥९८॥

ज्या सद्‍गुरूच्या अंगुष्ठीं । ब्रह्मादि देवांचिया कोटी ।

ज्याच्या नांवाची गोठी । वंद्य वैकुंठीं कैलासीं ॥९९॥

ज्याचें नांव ऐकतां कानीं । यम काळ कांपती दोनी ।

ब्रह्मा विष्णु रुद्र तिन्ही । हात जोडुनी तिष्ठती ॥३००॥

सकळ वेदांचें निजसार । तें सद्‍गुरुस्वरूप साचार ।

ऐसा शिष्यासी निर्धार । निरंतर असावा ॥१॥

त्यासी मनुष्यबुद्धीं आपण । कदा न करावें हेळण ।

गुरुनिंदा बोलतां जाण । आली नागवण सर्वार्थीं ॥२॥

सद्‍गुरुनिंदेचा एकांतु । करूं आला परम आप्तु ।

तो त्यागावा जेवीं पतितु । हा नव्हे अर्थु तैं पळावें ॥३॥

सद्‍गुरुनिंदेची वाणी । ऐकतां बोटें द्यावीं कानीं ।

सद्‍गुरूसी भावें स्मरोनी । तें स्थानही त्याजोनी पळावें ॥४॥

त्या सद्‍गुरुनिंदेची स्वयें मातु । करिता बुडाला निजस्वार्थु ।

धुळीस मिळाला परमार्थु । आला अपघातु अंगासी ॥५॥

ऐशिया गुरूच्या ठायीं जाण । पत्र पुष्प अन्न धन ।

शिष्यें करूं नये वंचन । तें स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥६॥

. . .