Home

जयमंगल अष्टगाथा

जयमंगल अष्टगाथा अर्थात भगवान बुद्धांचे आठ मोठे विजय ज्यांना Stanzas of Victory असेही म्हणतात. या जयमंगल अष्टगाथांचे बौद्ध तत्वज्ञानात खुप महत्व आहे. जयमंगल अष्टगाथा व त्यांच्या कथा या लेखमालिकेत आपण त्या आठ विजयांबद्दल सविस्तर माहीती, त्यांच्या गाथांमागे असलेल्या कथा काय आहेत ते पाहुया... त्या कथांमधुन तुम्ही योग्य तो बोध घ्यावा.....

जयमंगल अष्टगाथा मधल्या पहिल्या गाथेमध्ये माराची गोष्ट सांगीतली आहे ती याप्रमाणे,

बाहुं सहस्समभिनिम्मित सायुधंतं
गिरिमेखलं उदित-घोर-सरेन मारं
दानादि धम्म विदिना, जितवा मुनिंदो,
तं ते जसा भवतु ते जयमङ्गलानि

ज्या मुनींद्राने अत्यंत तीक्ष्ण हत्यार घेऊन सहस्रबाहु, गिरिमेखलं नावाच्या हत्तीवर आरुढ झालेल्या व अत्यंत भयानक व अफाट सेनेसह आलेल्या माराला आपल्या दान आदि धर्मबळाने जिंकले,, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो...

मारावर विजय

परिव्राजक सिद्धार्थ बुद्ध होण्याच्या तयारीत आहेत, हे पाहून माराला अतिशय वाईट वाटले. तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला आजपर्यंत कोणत्याही श्रमणाने किंवा ब्राह्मणाने माझा पराजय केला नाही. परंतु हा श्रमण गौतम खुप दृढनिश्चयी दिसतो, हा माझा अपमान करुन माझ्यापासुन स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करत आहे, मला याचे वेळीच दमन करायला हवे, नाहीतर तो माझ्या हातुन कायमचा सुटेल व माझ्यविरुद्ध बंड करुन उठेल. असा विचार करुन माराने त्याच क्षणी आपली सेना तयार केली.

अशा प्रकारे आपल्या अफाट सेनेला पुढे पाठवुन मार गिरीमेखल नावाच्या हत्तीवर आरुढ होऊन त्यांच्या मागोमाग आला. इकडे माराच्या अफाट सेनेने बोधीसत्त्वाचा पराभव करण्यासाठी प्रयत्नांची पाराकाष्टा केली होती. आपल्या शस्त्रांचा वर्षाव त्यांनी बोधीसत्वावर चालवला होता. परंतु त्या शस्त्रास्त्रांची फुले बनुन बोधीसत्त्वाच्या अंगावर येऊन पडत होती. कोणतीच शस्त्रास्त्रे बोधीसत्वाच्या अंगावर काहीच परिणाम करु शकत नव्हती. मारालाही कळुन चुकले होते कि आपल्या अफाट सेनेचा पराभव निश्चित आहे, त्याला त्याच्या सेनेचा पराभव दिसत होता, तेव्हा त्याने आपल्या पराभवाने वादळ उत्पन्न केले. आसपासचे वृक्ष कोसळु लागले, पशूपक्ष्यांचा एकच आक्रोश सुरु झाला. परंतु बोधीसत्व आपल्या समाधीपासुन तीळमात्रही ढळला नाही.

तेव्हा बोधीसत्वाला पाण्याने बुडवुन मारीन म्हणुन त्यान पाऊस पाडला, जिकडे तिकडे महापुर आणला परंतु पाण्याचा एकही थेंब बोधीसत्वाला स्पर्श केला नाही.

त्यामुळे व्यथीत झालेल्या माराने सहा प्रकारच्या वृष्टी उत्पन्न केल्या परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही. हे पाहुन मार अतिशय खिन्न झाला. तरीसुद्धा त्याने प्रयत्न करणे सोडले नाही. त्याने भयानक काळोख उत्पन्न केला, ती वैशाख शुद्ध पोर्णीमेची रात्र होती. पोर्णीमेच्या चंद्राने आणि चांदण्याने रात्र खुप प्रकाशलेली होती. परंतु माराने बोधीवृक्षाजवळ भयानक अंधकार पसरविल्या कारणाने, माराचा गिरीमेखल हत्ती व जवळपासची पर्वतशिखरे घुबडांना दिसेनाशी झाली. परंतु बोधीसत्वाच्या प्रज्ञारुपी प्रदीपापुढे माराचा अज्ञान रुपी अंधकारचा नायनाट केला.

आजपर्यंत त्या माराला पराभव काय आहे, हे माहीतच नव्हते, आजपर्यंत त्याचा कधीच पराभव झाला नव्हता. जरी एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने माराविरुद्ध युद्ध पुकारले तरी मार आपल्या एखाद्या तुकडीला पाठवुन त्याचा तेव्हाच पराभव करायचा.

श्रमण गौतम साधारण तपस्वी नव्हता हे जाणुनच माराने आपल्या सैन्याला त्याच्यावर तुटुन पडायच्या आज्ञा केल्या होत्या, परंतु आपल्या अफाट सेनेला बोधीसत्व चारी मुंड्या चित करल हे त्या जाणले नव्हते. आपली सर्व शक्ती पणाला लावुन देखील तो बोधीसत्वाला आपल्य मार्गापासुन क्षणभरही विचलीत करु शकला नव्हता, आता परभवाची वार्ता घेऊन माघारी जाण्यापेक्षा बोधीसत्वावर हल्ला करणे माराला योग्य वाटले. तेव्हा मार आपल्या गिरीमेखल हत्तीवरुन खाली उतरला आणि बोधीसत्वाला म्हणाला सिद्धार्था इथुन मुकाट्याने चालता हो, नाहीतर एका क्षणात तुझा नाश करेन.

तेव्हा बोधीसत्व म्हणतो, हे पापी मारा, तुझ्या सैन्यांना मी चांगल्या प्रकारे ओळखतो, वेगवेगळ्या प्रकारच्या चैनीच्या वस्तु हि तुझी सर्वात पुढे जाणारी तुकडी आहे. तहान, भुक, तृष्णा, आळस, गर्व, किर्तीची आशा, आत्मस्तुती आदी, ह्या तुकड्या त्यामागोमाग येत असतात. कच्च्या मातीचे भांडे जसे फोडतात त्याप्रमाणे मी तुझ्या सैन्याचा पराभव करेन.

हे ऐकुन मार म्हणाला, त्या सर्व गोष्टींना जाऊदे,, आधी तु ज्या आसनावर बसला आहेस, तिथुन उठ ते माझे आसन आहे. चल ताबडतोब चालता हो इथुन. त्यावर बोधीसत्व म्हणाला, कशावरुन तु म्हणत आहेस कि हे तुझे आसन आहे, याचा तुझ्याकडे काही पुरावा आहे काय? हा प्रश्न ऐकुन माराच्या सेनेतील अनेक लोक योध्ये म्हणायला आहोत कि आम्ही साक्षी आहोत. तेव्हा पापी मार बोधीसत्वाला म्हणाला कि, सिद्धार्था हा माझा पुरावा आहे, चल आता इथुन मुकाट्याने चालता हो. त्यावर बोधीसत्व म्हणाला कि मी अनेक जन्मी दानपारमिता पुर्ण करुन या आसनावर बसण्याचा अधिकारी बनलो आहे, यावर मार म्हणाला याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे.

तेव्हा बोधीसत्व म्हणाला हि पृथ्वी साक्षी आहे, हि वसुंधरा साक्षी आहे. याचबरोबर तिथे एक देवता प्रगट झाली आणि तिने साक्ष दिली कि, श्रमण गौतमाने अनेक जन्म घेऊन दानपारमिता पुर्ण केली याबाबत साक्ष दिली. येवढे बोलुन त्या देवतेने आपले ओले केस पिळले आणि त्या प्रवाहाबरोबरच आपल्य अफाट सेनेसह व गिरिमेखल हत्तीसोबत मार वाहुन गेला. माराची झालेली दुर्दशा पाहुन देवांगण बोधीवृक्षाजवळ जमले आणि त्यांनी सिद्धार्थावर पुष्पवृष्टी केली. तेव्हा बोधीसत्वाने पुढील गाथा म्हटली,,

अनेकजातिसंसारं संधाविस्सं अनब्बिसं गहकारकं गवेसन्तो दुक्खा जाति पुनप्पुनं।गहकारकं दिट्टो ऽसि पुन गेहं न काहसि सब्बा ते फासुका भग्गा गहकूटं विसंखितं
विसंखारगतं चितं तव्हानं स्वयमज्झगा।


धम्मपदाच्या १०३ ऱ्या गाथेद्वारे भगवान बुद्ध आपल्याला सांगतात,,

यो सहस्सं सहस्सेन, सङ्गामे मानुसे जिने। एकञ्च जेय्यमत्तानं स वे सङ्गामजुत्तमो॥

जो युद्धात लाखो जेत्यांना जिंकतो (त्या जेत्याहुन), जो एक स्वतःला जिंकतो, तो उत्तम युद्धजेता होय.

खरच तो सर्वश्रेष्ठ विजेता होता.. ज्याने स्वतःलाच जिंकले...

बाहुं सहस्समभिनिम्मित सावुधंतं,
गिरिमेक्खलं उदित-घोर-ससेन मार
दानादि धम्मविधिना जितवा मुनिंदो
तं ते जसा भवतु ते जयमङलानि


ज्या मुनिंद्राने तीक्ष्ण व बळकट हत्यारे धारण केलेल्या सहस्र बाहुबळ निर्माण करुन गिरीमेखल नावाच्या मस्त हत्तीवर बसुन अनंत, भयानक व अफाट सेनेसह माराला क्षणातच आपल्या दानादी धर्मबळाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.

सुचना : हे युद्ध बोधीसत्वाच्या मनातील चांगले विचार विरुद्ध वाईट विचार असे होते, त्याला अलंकारीक रीत्या सजवले आहे.

 

इतर कथा आपण इथे वाचू शकता. 

. . .

Subscribe to our mailing list!

Subscribe
We don't spam