श्री गणेश प्रताप

सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.


प्रस्तावना

’ श्री गणेश प्रताप’ हा ग्रंथ कै. विनायक महादेव नातू यांनी गणेशपुराणाच्या आधारे लिहिला. त्यांचे गुरू बडोद्याचे निजानंद अथवा ब्रम्हानंद होत. ग्रंथ लेखनाचा समाप्तिकाळ विक्रम सं १९०५ सन १८४८ शके १७७७ माघ शु. १४ मंगळवार असा आहे. ग्रंथाची पहिली आवृत्ती शिळाप्रेसवर छापली होती, तर दुसरी आवृत्ती सन १८९१ मध्ये छापली गेली.

’ सुखकर्ता तू दुःखहर्ता । विघ्नविनाशक विद्यादाता । भवसागरी ह्या तूचि त्राता । ’ अशा सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे. दयाघना श्रीगजानना कोणास काय पाहिजे हे तुला सांगावे लागत नाही. तुला शरण आलेल्यांचे तु नेहमी भलेच करतोस. दुष्टांचा तु संहार करतोस. ’श्री गणेशप्रताप ’ ग्रंथात वर्णिलेल्या बाललीला व परा्क्रम वाचून मनाला शांती व समाधान मिळते. जो भक्त एकाग्रतेने व मनोभावाने ह्या ग्रंथाचे वाचन करील त्याचे मनोरथ पूर्ण होतील यात संदेह नाही. निर्गुण असूनही, हे गजानना तू सगुण रूपात प्रगट होतोस. मनाची एकाग्रता ठेऊन भक्ति केल्यास श्रीगजाननाचे विशाल रूपात दर्शन होते. जेव्हा श्रीगजाननाची सगुण रूपात भक्ति केली जाते, तेव्हा माया हि मिथ्या आहे, ब्रम्ह हेच सत्य आहे हे मनाला पटते.