श्री गणेश प्रताप

सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.


अध्याय ५

श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ।

जयजयाजी गजानना । पुढे करी पद्यरचना । लागो छंद तुझा मना । इतर वासना खंडोही ॥१॥

श्रोते परिसा पूर्वानुसंधान । देवत्रयी वर देऊन । मग पावला अंतर्धान । वारणानन जगदात्मा ॥२॥

गणेशवरे चतुरानन । झाला वेदशास्त्रसंपन्न । शापानुग्रह ज्ञानवान । ह्रदयी मान संचरला ॥३॥

सृष्टी करणे माझे हाती । आता इतरांचा पाड किती । कर्तुमकर्तु अद्भूतशक्ती । मजप्रति लाधली ॥४॥

मी करीन जी कार्यता । ती घडेल गोष्टी आता । ऐसा गर्वे राहटता । विघ्ने अवचिता उद्भवली ॥५॥

उत्पन्न जाहले विघ्नपुरुष । नानापरी ज्यांचे वेष । दशबाउ सप्तशीर्ष । पंचास्य विशेष त्यामध्ये ॥६॥

एकाचे विस्तीर्ण तीन पाय । अष्टवक्र एक कज्जलकाय । दाविती नानापरीचे भय । मारिती घाय निष्ठुरे ॥७॥

चारी शिखा कवळोनी । कोणी बांधिती चरणी । कोणी सोडविती येउनी । अभयवचनी गौरविती ॥८॥

कमळासन धरून चरणी । कोणी वोढिती निष्ठुरपणी । कोणी बांधिती त्याचे पाणी । पाडोनि धरणी लोळविती ॥९॥

एक म्हणती मारा मारा । कोणी म्हणती करा पुरा । एक दाढा खावोनि करकरा । म्हणती धरा पळतो हा ॥१०॥

पळता लागले एक पाठी । दुसरा म्हणे नका करू कष्टी । तिसरा येउनिया मुष्टी । भली पृष्ठी गौरवि ॥११॥

कोणी त्यापासून सोडविती । मुख कुरवाळून चुंबन घेती । कोणी मांडीवर निजविती । म्हणती भ्रमलास पहुडे का ॥१२॥

कोणी म्हणती ब्रह्मा भला । चार मुखानी फार शोभला । कोणी कवळोनि दाढीला । म्हणती लेकराला मारू नका ॥१३॥

कोणी करिती निर्भत्सना । एके आरंभिले स्तवना । ब्रह्मदेवास आली मूर्छना । म्हणे गजानना धावे का ॥१४॥

तुझा दास मी मारिती मज । देवा तुझी जाईल लाज । मग कृपेने द्रवला गणराज । नाभी नाभी बोलतसे ॥१५॥

ऐसी होता आकाशवाणी । पळाल्या विघ्नाच्या श्रेणी । विव्हळ होऊन अंतःकरणी । उठोनिया बैसला ॥१६॥

वाणी गर्जे पुन्हा अंबरी । ऊठ आता तप करी । गर्व टाकोनिया दुरी । ध्यान धरी निर्मल पै ॥१७॥

धात ऐकोनि आकाशवाणी । स्वस्थ जाहला अंतःकरणी । म्हणे जोडोनि सारे पाणी । तपोकरणी कशी करू ॥१८॥

नाही मंत्रविधान ठावे । तरी तप कसे करावे । तुझी स्मरतो आता नावे । नाही ठावे इतर काही ॥१९॥

मनी अद्बुत चिंता झगटली । तव त्यासि निद्रा लागली । बाह्यवृत्ति विरोनि गेली । स्वप्न देखे ब्रह्मा तदा ॥२०॥

जलार्णवी फिरो लागला । तेथे एकवट देखिला । त्याचे पानावर पडला । बाळ देखिला डोळस ॥२१॥

माथा शोभे कुरळ जावळ । शरीर रक्तवर्ण केवळ । कंठी रुळे मौक्तिकमाळ । भाळी निर्मळ बालशशी ॥२२॥

किरीटकुंडले मंडित वद । समीप गेला कमलासन । बाळके शुंडाग्रेकरून । मस्तकी जीवन शिंपियेले ॥२३॥

करोनिया हास्यवदन । बाळ बैसला उठोन । मग बोले मंजुळ वचन । चतुर्वदन श्रवण करी ॥२४॥

बाळक म्हणे विरंचीसी । व्यर्थ तू येव्हडा वाढलासी । ज्ञान नाही किमपी तुजसी । व्यर्थ गर्वासि धरू नको ॥२५॥

मंत्र सांगतो तुजला जाण । याचे करी पुरश्चरण । साहा लक्ष संख्या परिपूर्ण । होता दर्शन देईन मी ॥२६॥

ऐसे सांगोनि तत्क्षणी । मंत्र उपदेशिला सव्य कर्णी । मस्तक ठेऊनिया चरणी । मग तेथोनी निघाला ॥२७॥

ऐसे स्वप्न पाहत पाहत । ब्रह्मा जाहला जागृत । मग पाहूनिया एकांत । तप करीत बहुसाल ॥२८॥

उभा राहून एकचरणी । मंत्र जपे अंतःकरणी । कृपेने द्रवला अंकुशपाणी । वरदानी प्रगटला ॥२९॥

कोटिसूर्य जाळ ऐसा । उभवला साकार ठसा । त्रिभुवनदाहक असा । त्याचे सरिसा उभा राहे ॥३०॥

ऐसी प्रभा पाहून ज्याची । थरथरोनि कापे विरंची । माळ गळाली हातींची । मांदाराची तेधवा ॥३१॥

मग झाकोनि सारे नेत्र । होवोनिया विकळगात्र । उच्चारिता राहिला मंत्र । त्राहि त्राहि म्हणतसे ॥३२॥

पाहून त्याची प्रेमभक्ती । कृपेने द्रवला मंगलमुर्ती । मग धरोनिया हाती । नाभी नाभी म्हणतसे ॥३३॥

सौम्यरूप अवलंबुन । स्रष्ट्यास म्हणे गजानन । आता उघडी का नयन । घे दर्शन सप्रेमे ॥३४॥

जे इच्छीत तुझे मानसी । ते सर्व गा तू पावशी । माझी होता कृपाराशी । मग तयासी उणे नसे ॥३५॥

ऐकोनि आनंदला विधाता । मग चरणी ठेविला माथा । जरी प्रसन्न तू एकदंता । मज सर्वथा जाहलासी ॥३६॥

तरी द्यावी अखंड भक्ती । ज्ञानविज्ञान सदा चित्ती । न व्हावी कदा विघ्नप्राप्ती । सृष्टिप्रति करिता पै ॥३७॥

न उठावा गर्व मद । सदैव असावा प्रमोद । अंती पावोनि त्वत्पद । अति आनंद भोगवी का ॥३८॥

तू उपनिषदा अगोचर । तोच जाहालासि गोचर । माझे भाग्य आजि थोर । तेणे साचार जाहले ॥३९॥

मग देवोनि दिव्यासन । मांडिले पूजाविधान । पाद्यार्घ्य आचमन । मंगलस्नान करवीतसे ॥४०॥

वस्त्रोपवस्त्र कुंकुम चंदन । यज्ञोपवीत मधुपर्कदान । मग देवोनि शुद्धाचमन । माळा सुमन घातल्या ॥४१॥

नानाविध धूप परिमळ । नीरांजन दीप तेजाळ । शर्करा लाडु नैवेद्यफळ । नवविधा तांबूल अर्पिला ॥४२॥

मग द्यावया दक्षिणा । दोन कन्या कमलेक्षणा । ज्यांची लावण्यतुळणा । करिता उणा चंद्रमुखी ॥४३॥

चारुप्रसन्नवदना । ऐशा रम्य दिव्यांगना । देता जाहला गजवदना । प्रसन्नमन तेधवा ॥४४॥

आर्तिक्य दीप पुष्पांजुळी । गणेशरचरणी अर्पिली । मग प्रदक्षिणा घातली । तेणे खंडली भवबाधा ॥४५॥

सहस्त्रनामे करिता स्तुती । तेणे तोषला गणपती । सिद्धिबुद्धि धरोनि हाती । अंतर्धान पावला ॥४६॥

मग तोषे कमलासन । सृष्टी करित उत्पन्न । योगनिद्रावश जनार्दन । होऊनि सुखे निद्रा करी ॥४७॥

निद्रिस्थ असता शार्ङ्गधर । कर्णापासोनि भयंकर । उत्पन्न झाले महा असुर । गर्जना थोर करिती तदा ॥४८॥

तेणे दुमदुमिला ब्रह्मांडगोळ । देव होऊनि भयविव्हळ । स्वाश्रमाहूनि घेती पळ । गिरिकंदरी राहिले ॥४९॥

त्यांची हरोनिया संपत्ती । मग गेले सत्यलोकाप्रती । मुख पसरोनि धावती । धात्याप्रति गिळावया ॥५०॥

तेथोनि पळाला कमलासन । गेला क्षीरसागरालागुन । तव निद्रिस्थ जगज्जीवन । पाहून खिन्न मन जाहला ॥५१॥

करी योगनिद्रेचे स्तवन । तूच जगाचा एक जीवन । तू गुणज्ञ गुणनिधान । तुझे आधीन विश्व हे ॥५२॥

तूच स्वाहा स्वधारूपधरा । मात्रार्धमात्रा श्रुतिस्वरा । महामाया तूच चतुरा । परात्परा तूच पै ॥५३॥

तू जगज्जननी सर्वकर्त्री । विश्वव्यापका विश्वहंत्री । संध्या क्षुधा तृषा धात्रीई । पार्वती सावित्री तूच पै ॥५४॥

सर्वभूती तूच शक्ती । त्रैलोक्यकर्ता तुझा पती । तेणे निद्राभरे केली स्थिती । त्याशी जाग्रुती द्यावी तुवा ॥५५॥

ज्यापासोनि झाले जग । तेणेच पालन केले सांग । अवतार धरविसी पडता व्यंग । संकष्ट सांग निवारिशी ॥५६॥

मधुकैटभ हे दुष्ट दानव । त्याणी पळविले सकल देव । झाले हतभाग्य वैभव । धर्म सर्व बुडाले ॥५७॥

साधू पावले अत्यंत्र त्रास । जिवे मारिती गोब्राह्मणास । माझा करू आले ग्रास । जेवी चंद्रास राहुकेतू ॥५८॥

आता करूनिया तू बोध । नारायणास करी सावध मग होईल त्यांचा वध । दुःखसमंध खंडेल पै ॥५९॥

योगनिद्रेचा ऐसा स्तव । करिताच उठला माधव । आश्वासोनि ब्रह्मदेव । घेतली धाव नारायणे ॥६०॥

पांचजन्य लावोनि मुखी । सबळ बळे जेव्हा फुंकी । त्या नादे झाले दैत्य दुःखी । सकल सौख्यी उबगले ॥६१॥

म्हणती आम्ही स्वर्गपाळा । जिंकिले परंतु ऐशा प्रबळा । सपत्‍नाते न देखिले डोळा । घनसावळा हा होय ॥६२॥

ज्याच्या शंखाचा अद्भुत नाद । संचरोनि करी ह्रदयभेद । तो हा आला मुकुंद । त्याशी युद्ध योग्य आम्हा ॥६३॥

मग येऊन नगराबाहेरी । त्याणी पडखाळिला हरी । म्हणती आमचा युद्धकुंद हरी । तरीच संसारी धन्य पै ॥६४॥

मल्लयुद्धाची आम्हा आवडी । हरि म्हणे मज हीच गोडी । ऐसे बोलोनि तातडी । युद्धपरवडी मिसळले ॥६५॥

दो दो हाते एकेकाशी । युद्ध करी ह्रषीकेशी । बाहू पिटोनि बाहूशी । ह्रदय ह्रदयाशी आदळती ॥६६॥

आस्फोटण आणि विकर्षण । मस्तकी मस्तकी आदळण । चमक थरक उल्लाळण । समरंगण अंगबळे ॥६७॥

ऐसे युद्ध बहुसाल । करिता भागला तमालनील । तेथोनि निघाला गोपाल । वनातरी प्रवेशला ॥६८॥

गंधर्वाचेनि वेषे । गायन मांडिले परमपुरुषे । मंजूळ आलापाचे घोषे । मन संतोषे सकळांचे ॥६९॥

गायने वेधले राजहंस । भक्षिता राहिले मौक्तिकघोष । गेंडे शार्दूल ससे तरस । आसपास धाविन्नले ॥७०॥

मुखी खाता तैसाच चारा । हरणे धावती एकसरा । तन्मय जाहल्या अप्सरा । त्याणी सारंगधरा वेढिले ॥७१॥

गण गंधर्व यक्ष राक्षस । तन्यम होऊनि गायनास । सांडोनि निजव्यापारास । तेही श्रवणास वेधले ॥७२॥

गज केसरी निर्वैर । नकुल पादोदर मयूर । मूषक आणि मार्जार । गायने निर्वैर पै केले ॥७३॥

काय गायनाची अद्भुत कला । ऐकता हराशी वेध लागला । तेणे पाचारिले गायकाला । गंधर्वाला अत्यादरे ॥७४॥

पुष्पदंत निकुंभासी । शिवे पाठविले तयापाशी । ते येऊनि त्यापाशी । नमनेसि विनविती ॥७५॥

तुमची ऐकोनि गायनकला । महेश्वरासी वेध लागला । तो पाचारितो आपणाला । आता चला सत्वर ॥७६॥

ऐकता त्याचे ऐसे वचन । त्वरे चालला जगज्जीवन । कैलासाचळी येऊन । केले नमन शंकरा ॥७७॥

उठोनिया चंद्रशेखर । गायकाचा धरोनि कर । बसवी आपले समोर । आनंद थोर तयासी ॥७८॥

हैमवती मनरंजन । म्हणे कराजी आता गायन । क्षुधातुर आमचे कान । गानभोजन द्याजी त्यांसी ॥७९॥

ऐकताच शंभूचे वचन । गायके विणा सम्यक लाऊन । करिता झाला मग गायन । लुब्धले मन सर्वांचे ॥८०॥

संतोषतांच भोगिभूषण । मग प्रगटल नारायण । पाहाता आलिंगी गौरीरमण । हर्षपूर्ण तयासी ॥८१॥

हर म्हणे लक्ष्मीरमणाशी । गायने संतोषलो मानसी । अंतरी काय जे इच्छिसी । ते मजसी मागावे ॥८२॥

ऐकोनि बोले चक्रधर । मधुकैटभ मातले असुर । त्यासि युद्ध करिता साचार । क्षीणतर शक्ती जाहली ॥८३॥

यदर्ध धरोनि गंधर्ववेष । गायने केला तुझा तोष । तु तुष्टलासि परमपुरुष । उपाय विशेष सांग माते ॥८४॥

मग हासे पार्वतीपती । आरंभी अर्चिला नाही गणपती । तेणे जाहाल्या क्षीण शक्ती । लक्ष्मीपती संग्रामी ॥८५॥

मग म्हणे इंदिरावर । कैसा पूजावा लंबोदर । मज सांगाजी आता सत्वर । विघ्नहर अर्चनविधी ॥८६॥

मग रिणारी चक्र शोधुन । षडक्षरमंत्रे भगवान । उपदेशी जनार्दन । करी अनुष्ठान या मंत्रे ॥८७॥

विष्णु जाऊन सिद्धक्षेत्री । पुरश्चरण करी उत्तममंत्री । कृपेने द्रवला जगत्सूत्री । प्रत्यक्ष नेत्री प्रगटला ॥८८॥

कोटिसूर्याग्नीसन्निभ । प्रसन्न झाला उरगनाभ । म्हणे जाहलोरे तुज सुलभ । वर माग मनेच्छा ॥८९॥

ऐकताच ऐसे वचन । नमस्कार करी जनार्दन । नानारूपधर तु गजवदन । मज प्रसन्न जाहलासी ॥९०॥

ब्रहेशादि देव समस्त । तुझे अवलोकनी नाहीत शक्त । तो तू मज भेटलासी अनंत । एकदंत निजरूपे ॥९१॥

ऐसी करिता बहुत स्तुती । मग तुष्टला तो गणपती । वर मागा गा कमळापती । जो का चित्ती वर्ततसे ॥९२॥

हर्षे बोले कमलापती । दर्शने जाहली सर्वप्राप्ती । एक मागणे तुजप्रती । ते गणपती मज द्यावे ॥९३॥

मधुकैटभ दानवाते । मरण घडो माझे हाते । तथास्तु म्हणोनि एकदंते । त्रिविक्रमाते गौरविले ॥९४॥

वर देवूनिया गजानन । मग पावला अंतर्धान । तेथेच देवालय करून । गजानन स्थापिला ॥९५॥

विनायक नामे अतिउत्तम । मूर्ती स्थापी पूर्णकाम । त्याचे दर्शने उत्तम । सकलकाम पूर्ण होती ॥९६॥

मग तेथोनि निघोनिया हरी । मधुकैटभाते हांकारी । ते येऊनि नगराबाहेरी । द्वंद्व समरी सिद्ध जाहले ॥९७॥

दैत्य बोलती गर्वोन्मत्त । लघुरूपे झालासि प्राप्त । कैसा जय पावशील युद्धात । मग अनंत बोले तया ॥९८॥

वडवानल लघुच परी । त्रैलोक्याचे दहन करी । लघुदीप तो रात्रीभीतरी । संहार करी तमाचा ॥९९॥

लघु वज्र पर्वताचे । क्षणे पिष्ट करी साचे । तेवी मर्दन करून तुमचे । करीन जगाचे कल्याण पै ॥१००॥

ऐकताच दानव क्षोभले । मल्लयुद्धालागी मिसळले । बहुत दिवस युद्ध जाहले । परी न श्रमले दैत्य ते ॥१॥

हरि विचारी मानसी । धर्मयुद्ध करिता यांसी । न पावतील पराजयासी । आता कपटासी आचरावे ॥२॥

मग बोले राजीवनयन । तुष्टलो तुमचे युद्ध पाहून । आता मागा वरदान । तुम्हा देईन मागाल ते ॥३॥

ऐकोनि हासले दोघेजण । तुझ्या शक्ती जाहल्या क्षीण । वर कैसा देशील जाण । काय उणे आम्हासी असे ॥४॥

दैत्य म्हणती माग आता । वर देऊ तुज आता अनंता । ऐकोनि जाहला वर मागता । धातापिता तेधवा ॥५॥

माझे हाते पावा निधन । हेचि द्यावे वरदान । ऐकोनि जाहले प्रसन्नवदन । हे वरदान तुज दीधले ॥६॥

मरणकाली तुझे स्मरण । तेणे खंडे जन्ममरण । तो तू प्रत्यक्ष नारायण । देह अर्पण तुज करु ॥७॥

तुझे हाते मरण पावता । झाली जन्माची सार्थकता । याहून लाभ तो कोणता । मारी आता आम्हासी ॥८॥

ऐसे ऐकता जगज्जीवने । मस्तक छेदिले सुदर्शने । अंबरी वर्षती देव सुमने । प्रसन्न मने करोनिया ॥९॥

देव गर्जती जयजयकारी । दुंदुभी वाजती अंबरी । गणपतीप्रसादे श्रीहरी । विजयनोवरी वरी सदा ॥११०॥

जयजयाजी कल्याणमूर्ती । तुझी अगम्य मंगलकीर्ती । परमपुरुष तू गणपती । मजप्रति तुष्टलाशी ॥११॥

स्वस्तिश्रीगणेशप्रतापग्रंथ । गणेशपुराणसंमत । उपासनाखंड रसभरित । पंचमोध्याय गोड हा ॥१२॥ ओव्या ॥११२॥ अध्याय ॥५॥