श्री गणेश प्रताप

सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.


क्रीडाखंड अध्याय १०

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।

जयजय श्रीमंगलमूर्ती । विघ्नहरण ही तुझी कीर्ती । सत्य करूनिया निगुती । कथा चालवी आपली पुढे ॥१॥

व्यासास म्हणे नाभियोनी । पार्वती संभव मोक्षदानी । अवतरोनिया मेदिनी । भाररहित केली तेणे ॥२॥

दुरासदाचे मस्तकावरी । एक पाद अद्यापवरी । ठेऊनिया भक्तकैवारी । वाराणसीचे द्वारी उभा असे ॥३॥

भस्मासुराचा सुत । दुरासदनामे विख्यात । तेणे तप केले बहुत । वाढली वारुळे अंगावरी ॥४॥

त्याच्या तपाचे महाक्लेश । पाहोनिया अपर्णेश । प्रसन्न होवोनिया जगदीश । द्यावया वरास पातला ॥५॥

दैत्य काढोनि वारुळातून । पुर्णावयव त्याते करून । मग म्हणे वरदान । दुर्गारंजन ते काळी ॥६॥

दैत्य म्हणे देवाधिदेवा । भक्तवत्सला मृडानीधवा । तवपदलाभ ह्रदयी द्यावा । कदा न व्हावा पराजय ॥७॥

सुरासुर नरकीटक । पशुपक्ष्यादि जीव अनेक । त्यापासोनिया मृत्यु देख । मजलागोनि न व्हावा ॥८॥

त्रैलोक्याचे वैभवाते । मी वागवावे आपुले हाते । तयासि बोलिजे गौरीकांते । ऐक तूते सांगतो की ॥९॥

जेव्हा रहाटशील अमर्यादेन । तेव्हा शक्ती तेजसाकरून । तुझे करील रे भवमोचन । येरवी विजयी सर्वदा ॥१०॥

ठेऊनि वरदकर मस्तकी । अदृश्य जाहला पिनाकी । दुरासद विजयी भूलोकी । होवोनि नाकी प्रवेशला ॥११॥

दर्प पाहोनि तयाचा । स्त्रिदशांसह पुलोमजेचा । नाथ पळोनि जाता दैत्याचा । पती आत प्रवेशला ॥१२॥

सर्व देवांचे पदाधिकार । दैत्य स्थापोनि चालवी असुर । दिग्गज पालटी महावीर । दैत्ये तेव्हा स्थापियेले ॥१३॥

भविष्य जाणोनि मधुसूदन । क्षीरसागरी गेला निघून । इंदिराअंकी शिर ठेऊन । करिते जाहले शयनाते ॥१४॥

दिव्यवस्तू दिव्यांगना । नागकन्या मनुजांगना । उत्तमोत्तम रत्ने नाना । दैत्यवरे संग्रहिली ॥१५॥

नाहीच केला वीर त्रिभुवनी । दुरासद बैसला सिंहासनी । गर्जना करी तेक्षणी । कर जोडोनि सचीव पुढे ॥१६॥

अमात्यास म्हणे दैत्यपती । आपण वश केली सर्व जगती । त्रिभुवनीची वैभवस्थिती । माझे ठायी प्रवर्तली ॥१७॥

अमात्य म्हणती तुझे बोल । सर्व भासती आम्हास फोल । अवनीवरी खंड अमोल । काशीक्षेत्र न जिंकिले तू ॥१८॥

वाराणशी जिंकशील जरी । सर्वजेता होशील तरी । मग सुखवैभव संसारी । जन्मवरी भोगशील ॥१९॥

ऐसे ऐकता त्याचे वचन । दैत्य उठला हुंकारुन । चातुरंग सेना घेऊन । काशी भुवनी प्रवेशला ॥२०॥

येता ऐकोनिया दैत्य सबळ । काशी टाकोनिया पयःफेनधवळ । केदारी वसवी तेव्हा स्थळ । निजवस्तीसी शंकर पै ॥२१॥

सांब जाता काशीतून । आत मांडी सिंहासन । त्रिभुवनी विजयी होऊन । राज्य करी दुरासद ॥२२॥

स्वपराक्रमाचा अभिमान । होता राहटे अधर्मान । विहित कर्मे उच्छेदुन । असत्कर्मै चालवी ॥२३॥

स्वाहास्वधाकार वर्जित । मेदिनी जेव्हा म्लान होत । देव तेव्हा बुभुक्षित । होवोनि अशक्त दीन सदा ॥२४॥

अधर्म मातला अवनीवरी । दैत्यी भ्रष्टविल्या पतिव्रता नारी । ब्राह्मणगाई मारोनि करी । अमरारी अनर्थाते ॥२५॥

कापे थरारे अवनी । म्लानमुख सर्व सुधापानी । चतुराननाप्रति वंदुनी । दुःख निवेदनी प्रवर्तले ॥२६॥

अमर म्हणती परमेष्ठी । आता किती दिवस असावे कष्टी । रक्ष रक्ष आम्हा संकटी । येऊ दे पोटी दया तुझे ॥२७॥

आसुवे भरोनिया नयन । देव उभे कर जोडून । त्यास म्हणे कमलासन । उपाय येथून करितो मी ॥२८॥

सुरांसह कमलासन । शिवशक्तीपासी येऊन । स्तविता जाहला कर जोडून । दुःख मना होवोनिया ॥२९॥

जयजय जगज्जननी । सकल ब्रह्मांड कटाहयोनी । आदिमाया तु भवानी । जनीविजनी सर्व तू ॥३०॥

त्रिभुवनी स्त्रियांचे वेष जितुके । तू नटोनि दाविशी कौतुके । अंबे तुझी न जाणो कौतुके । भक्तपालके नगात्मजे ॥३१॥

सौभाग्यसिंधूची पूर्ण लहरी । अनाथनाथे त्रिपुरसुंदरी । तूचि इंदिरा शचि गौरी । कालशर्वरी तूचि पै ॥३२॥

तूचि अवघे करोनि जग । नांदविसी तूचि सुरंग । अंबे तुझा पावता अपांग । तुटे संग संसारींचा ॥३३॥

तुझी न होता कृपा गोमटी । आम्ही संसारी होतो कष्टी । तुझे सत्तेने पूर्ण सृष्टी । जीवनपृष्ठी नांदते की ॥३४॥

ऐकोनि देवांची प्रेमळ स्तुती । प्रसन्न जाहली आदिशक्ती । म्हणे प्रसन्न तुम्हाप्रती । मनोगती पावाल पै ॥३५॥

देव अंबेचा वर पाऊनी । मग विधीचे आज्ञेकरुनी । स्तविते जाहले सुधापानी । बहुधापानी दाटोनिया ॥३६॥

जयजयाजी अप्रमेया । भक्तरक्षका महाकाया । वेदसारा गुणमया । नये आयामाया तुझी ॥३७॥

तुचि जगाचा एक कारण । तूचि याचे करिसी रक्षण । अंती याचा नाश गजकर्ण । कर्ता तूचि निश्चये ॥३८॥

आम्ही तुझे सदा सेवक । आज्ञावंदनी असता देख । दैत्यभये पावतो दुःख । हे का गजमुखा न कळे तूते ॥३९॥

उन्मत्त दैत्य दुरासद । तेणे गांजिले त्वद्भक्तवृंद । हे तू न जाणशी आनंदकंद । विरला प्रमोद साधूचा ॥४०॥

राहिले त्वद्भक्तांचे भजन । राहिले वेदविहितविधान । स्वाहास्वधावषट्‌कारहीन । अवनीतळ जाहले ॥४१॥

अवनी जाते रसातळाला । धावे धावे का भक्तपाळा । ऐसे स्तवन ऐकता ते वेळा । नभोवाणी गर्जतसे ॥४२॥

आता तुमचे सरले क्लेश । शिवशक्तीपासोन मी जगदीश । उत्पन्न होवोनिया नाश । असुरांचा करीन हो ॥४३॥

गोब्राह्मणाचे करीन अवन । तुमची तुम्हास पदे देईन । अधर्माते उच्छेदुन । सद्धर्म स्थापीन अवनीवरी ॥४४॥

ऐसी ऐकोन नभोवाणी । लक्षू धावले शूलपाणी । तव त्याचे अंतःकरणी । चंचलत्व दिसेना ॥४५॥

ध्यानस्थ पाहता महादेव । अंबेपासी येऊनि देव । दावोनिया दीनभाव । वर्तमान निवेदिती ॥४६॥

सुरवरांचे क्लेश पाहुनी । संतप्त जाहली तेव्हा भवानी । क्रोधे श्वासोच्छ्‌वास टाकुनी । हुंकारोनि गर्जत ॥४७॥

तिचे नासाश्रोत्रनयन । त्यापासोन जाहले उत्पन्न । ब्रह्मांडाचे करणार दहन । अमोघ तेज तेधवा ॥४८॥

ते तेज पावले दिव्यगती । उत्पन्न जाहली विनायक मूर्ती । दशबाहू आयुधे हाती । प्रभा जगती न साहे ॥४९॥

किरीटकुंडले रत्नजडित । स्कंधी व्याल यज्ञोपवीत । भाळी कस्तुरीटिळक शोभत । मोदक हातात साजिरा ॥५०॥

चरणी गर्जती दिव्यनूपुरे । पाहता निजभक्तांचे मन मुरे । देव गर्जती जयजयकारे । मंगल तुरे वाजविती ॥५१॥

करिता मंगलमूर्तीचा स्तव । जयजयाजी देवाधिदेव । तुझे न जाणो आम्ही वैभव । एक नाव जाणतो तुझे ॥५२॥

तू निर्गुण निराकार । सच्चिदानंद सर्वेश्वर । तुझेनि व्याप्त चराचर । आम्ही अमर अंश तुझे ॥५३॥

विनायकस्वरूप जग पावन । आज पाहती आमुचे नयन । धन्य आम्ही देवजन । तुज लागून पाहतो ॥५४॥

करिता कोटि वर्षे तप । तू न दिसशी गणाधिप । सुकृत न गणे आमचे अमुप । म्हणोनि तुजसी अवलोकितो ॥५५॥

अंबा पाहोनि त्या आत्मजा । स्ववती जाहली हिमनगजा । देवाधिदेवा महाराजा । मत्तनुजा सर्वात्मया ॥५६॥

ज्याचा न कळे वेदा पार । तेणे माझे गृही अवतार । धरोनि म्हणावी माझा कुमर । सर्वेश्वर जगदात्मा ॥५७॥

ऐसे परी ती गौरी । प्रशंसा जेव्हा तयाची करी । तेव्हा विनायक नमोन झडकरी । बोले उत्तरी मंजूळपणे ॥५८॥

करावया सत्पक्ष पालन । नासावया दनुजालागुन । करावया तुमचे सेवन । जाहलो उत्पन्न जगदंबे ॥५९॥

आता माते सांगशील काज । ते मी करीन गणराज । ऐकोनिया देव सहज । आत्मदुःखा निवेदिती ॥६०॥

पुत्रासि हैमवती निज वाहन । देती जाहली पंचानन । वरी विनायक आरूढोन । करी गर्जना भयंकर ॥६१॥

घेवोनिया देवसेना । विनायक पातला असुरभवना । त्याची ऐकोनिया भीमगर्जना । भस्मासुरनंदना भय वाटे ॥६२॥

तेणे करोनिया तयारी । येवोनि लोटला देवांवरी । शस्त्रास्त्रे घेवोनिया करी । परस्पर वैरी मारिती ॥६३॥

दुरासदास म्हणे विनायक । मूर्खा व्यर्थ का मरशी देख । तुझा गर्व अलोलिक । आता उतरीन दानवेशा ॥६४॥

तुवा पूर्वी देव जिंकिले । हे तो येथे कदा न चले । शरण मला येऊनि भले । करी आपुले दैत्याधमा ॥६५॥

हासोनि बोले दुरासद । कारे करिसी व्यर्थ वाद । तुझे छेदीन शिरसारविंद । जाय पळोनी येथुनी ॥६६॥

अरे बाळका बाळभावे । बोलसी ते म्या न मानावे । आता तू येथून जावे । घरी क्रीडावे बाळकांशी ॥६७॥

विनायक म्हणे रे चावटा । घेऊनि आलो वीरवृत्तीचा वाटा । किती बोलसी वटवटा । हो सावध युद्ध करी ॥६८॥

ऐसे वदता परस्पर । मल्लयुद्ध आरंभी सत्वर । घाय हाणिती निष्ठुर । देह संहार करू पाहती ॥६९॥

विनायके दुरासद उचलोनी । भूमीसि टाकिला आपटोनी । दैत्य पडला मूर्च्छा येउनी । निचेष्टित मुहूर्तवरी ॥७०॥

सावध होवूनि दैत्यपती । जाऊनि बैसला रथावरती । धनुष्यबाण घेऊनि हाती । शर निगुती सोडीतसे ॥७१॥

लक्षानुलक्ष शर सोडी । विनायक परशूने तोडी । लाविल्या बाणाच्या परवडी । दैत्य सेना भयत्रस्त ॥७२॥

विनायक बाणाचे घाय निष्ठुर । दैत्यांचा जाहला बहुत संहार । हे देखोनि दुरासद वीर । अग्न्यस्त्र सोडीतसे ॥७३॥

त्याचे करावया शमन । जलदास्त्र सोडिले विनायकान । तेणे करोनि वह्निशमन । दैत्य सेना वाहातसे ॥७४॥

वातास्त्र सोडोनि दैत्यपती । नाहीच करी मेघाप्रती । चंडवाते देवांप्रती । उडवू वाहे क्षणमात्रे ॥७५॥

विनायके पर्वतास्त्र सोडिले । लक्षानुलक्ष नग कोसळले । तेणे दैत्य चूर्ण जाहले । पळू लागले दशदिशा ॥७६॥

दैत्य सोडिले रौद्रास्त्र । त्यावरे विनायक ब्रह्मास्त्र । सोडिता दैत्य अनेक शस्त्र । देवावरी टाकीतसे ॥७७॥

ऐसे युद्ध घोरांदर । करोनि युद्धी व्हावे समोर । भोजन करून येतो मी ॥७८॥

नगरी प्रवेशला दैत्यपती । सेना घेऊनि सेनापती । लक्षोनिया विनायकाप्रती । शस्त्रसंभार वर्षतसे ॥७९॥

रणी एकला पार्वतीनंदन । दैत्यवीर आले बहुत धाऊन । हे पाहता जगज्जीवन । रूपे धरी षट्‍पंचशत ॥८०॥

अष्टबाहू दशभुज । षट्‌हस्त तेजःपुंज । रूपे नटला पार्वतीज । नानावहनी आरूढला ॥८१॥

वर्षू लागला शरभार । तेणे संव्हारिले अनेक असुर । कोणाचे तुटले चरणकर । होवोनि खटार पडले किती ॥८२॥

जाहला असुरांचा संहार । वाहू लागला शोणितपुर । परतोनि आला दैत्येश्वर । रणभूमीवर तेधवा ॥८३॥

तव सकल चमू जाहली मृत । पाहोनि डचकला भस्मासुरसुत । म्हणे कैसे घडले हे अद्भुत । जाहला अंत महावीरा ॥८४॥

कोठे गेले माझे बळ । किंवा दैव जाहले प्रतिकूळ । शिववचन आठवले तत्काळ । म्हणे वेळ तीच आता ॥८५॥

काय शक्तीच्या तेजाचे बळ । हा ग्रासू पातला मज काळ । प्राणभये दैत्य तत्काळ । पळता जाहला दिगंतरी ॥८६॥

त्यासि पाहे नगजासुत । पळता घालोनिया हात । धरोनि आणी अवचित । जाहला भ्रांत दैत्यपती ॥८७॥

मनी विचारी अपर्णासुत । पराङमुख न वधवा निश्चित । आणि शिव वर आहे अद्भुत । देवाहून मरण नाही तूते ॥८८॥

यास्तव यासि रक्षावे संन्निध । विनायक म्हणे रे मदांध । करीत नाही तुझा वध । धरी पद मस्तकावरी ॥८९॥

विराटरूपे जगदीश्वर । एक पद ठेवी मस्तकावर । काशीपुरीचे लक्षोनि द्वार । तेथे असुर स्थापिला ॥९०॥

आपण तेथे वक्रतुंड । होऊनि राहिले अखंड । भवभय हारी उदंड । अद्यापवरी जगदात्मा ॥९१॥

षट्‌पंचाशत गणेशमूर्ती । अद्याप काशीत विराजती । दर्शनमात्रे पूर्ण होती । भक्तमनोरथ सर्वदा ॥९२॥

विजयी जाहला पार्वतीकुमर । देव वर्षती पुष्पसंभार । करोनिया जयजयकार । परस्पर भेटती ते ॥९३॥

हे आख्यान करिता पठण । त्याचे तुटे भवबंधन ।सर्व विघ्ने होऊनि शमन । सुख भोगिती संसारी ॥९४॥

जयजयाजी विश्वपती । पार्वतीनंदना गणपती । तुझी न कळे अद्भुतकीर्ती । मंदमती म्हणोनिया ॥९५॥

पुढे बोलवी आपली कथा । तूच कर्ता एक विश्वनाथा । मज उद्धरावे अनाथनाथा । कृपा करोनि जगदीशा ॥९६॥

स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराणसंमत । क्रीडाखंड रसभरित । दशमोध्याय गोड हा ॥९७॥

श्रीगजाननार्पणमस्तु ॥ अध्याय १० ॥ ओव्या ९७॥

अध्याय दहावा समाप्त ॥