श्री गणेश प्रताप

सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.


क्रीडाखंड अध्याय ११

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।

जयजयाजी मंगलमूर्ती । मंगलदायका अनंतकीर्ती । विश्वात्मया गणपती । वेदा स्थिती न कळे तुझी ॥१॥

श्रोते परिसा कथानुसंधान । गृत्समद सांगे कीर्तीलागुन । धुंडीविनायकाचे आख्यान । जे पावन करी जना ॥२॥

कीर्ती म्हणे गृत्समदाशी । सांगे त्याचे कीर्तीशी । ऐकता सुधातर कथेशी । माझे श्रोत्रांसि तृप्ती नसे ॥३॥

गृत्समद म्हणे प्रसन्नमने । धन्य प्रश्न तुझा ललने । लीला दावोनि गजवदने । शंभू स्थापिला काशीत पै ॥४॥

कीर्ती म्हणे गृत्समदाला । मनोरम काशि केला । शंकर का त्यागोन गेला । कथी मजला सविस्तर ॥५॥

ऋषि म्हणे शुभानने । कथा मधुर ऐक काने । दीन जाहले अनावृष्टीने । भूमंडल तेधवा ॥६॥

उपाय अमरी केले बहुत । परी मेघ न वर्षती जला किंचित । तेणे रसधान्य न मिळे निश्चित । प्राणी बहुत निमाले ॥७॥

सूर्यवंशज दिवोदास । तप करी बहुत दिवस । ब्रह्मा येवोनिया तयास । उपदेशास करीतसे ॥८॥

विधि म्हणे नराधिपा । धर्मे राज्य करी बापा । तेणे मेघ वर्षोनि तापा । जगाचिया नासतील ॥९॥

राजा म्हणे कमलासना । हे नये गा माझे मना । राज्यांती होती दुःखे नाना । घोरतर निरयांची ॥१०॥

स्त्रष्टा म्हणे तयालागी । आग्रह न करी याप्रसंगी । अमुप तेज तुजलागी । प्रसन्न मने देतसे ॥११॥

येरू म्हणे आग्रह जरी । तरी द्यावी काशीपुरी । कदा अधर्म राज्यभारी । माझेन व्हावा देवराया ॥१२॥

तथास्तु म्हणोनिया तेवेळी । शंकराकडे सुरमंडळी । पाठवोनि तेथून शूली । मंदराचळी पाठविला ॥१३॥

देव म्हणती उमापती । मरीचीची तपस्थिती । काय वर्णावी तुम्हाप्रती । दीनदयाळा शंकरा ॥१४॥

तुमचे न होता त्यासि दर्शन । आता सांडील तो प्राण । दीनदयाळा ऐसे ऐकून । वेगे करून निघाला ॥१५॥

अंकि घेऊनि पार्वती । शिव बैसला नंदीवरुती । सगण येऊनिया पर्वती । निजभक्तांसि उद्धरिले ॥१६॥

मागे विधीने दिवोदासाशी । अर्पिली गे वाराणशी । तेणे अंगीकारोनि राज्याशी । सद्धर्माशी चालविले ॥१७॥

स्वये अग्निवरुणशशी । सूर्य जाहला तेजोराशी । नानारूपे देवकार्याशी । करिता जाहला कौतुके ॥१८॥

करवोनिया मेघवृष्टी । राये सुखी केली सृष्टी । अधर्म तेणे अवनीपाठी । नाहीच केला कौतुके ॥१९॥

प्रजासह राजा सदा । पाळोनिया वेदमर्यादा । अधर्मासि न शिवे कदा । संसारी आपदा असेना ॥२०॥

स्वधर्मनिष्ठ सदा ब्राह्मण । सकल स्त्रिया पतिपरायण । शिष्य गुरूची शुश्रूषा जाण । मनोभावे करिती सदा ॥२१॥

राये स्थापिले पदाधिकारी । प्रजापालक परोपकारी । ऐसा राजा उर्वीवरी । जाहला नाही दूसरा ॥२२॥

अपमृत्यु दुर्भिक्ष रोगापदा । उत्पात विघ्ने आधिबाधा । राष्ट्री नसे कोठे सदा । सुखसंपदा घरोघरी ॥२३॥

पुत्रवत्प्रजापाळण । सदा धेनूविप्ररक्षण । करोनिया राजा जाण । आनंदघन वर्ततसे ॥२४॥

येरीकडे मंदराचळी । घेवोनिया सुरमंडळी । शिव राहिला तयेवेळी । पार्वती गणासहित पै ॥२५॥

होता वाराणसीचा वियोग । मनी तळमळे गौरीरंग । परि जाणोनिया प्रसंग । राहता जाहला बहुकाळ ॥२६॥

दिवोदास राजा सत्वसंपन्न । सुधर्मा त्याचे अंगनारत्न । पति मानोन ईश्वरासमान । करी सेवन सर्वदा ॥२७॥

राजा जाणोनि धर्मनीती । भोगिता जाहला वसुमती । ऐसे लोटले दिवस किती । बहुत जाण नितंबिनी ॥२८॥

वाराणशीवियोगे तापला । शिवे मग विचार केला । शंभु म्हणे भैरवाला । जा काशीला तुम्ही आता ॥२९॥

रायासि करोनि मोहित । राज्यभ्रष्ट करावा निश्चित । काशींतूनि त्यास त्वरित । पदभ्रष्ट करावे ॥३०॥

वंदोनि आज्ञा निघाले । भैरव वाराणशी प्रवेशले । तीर्थविधी करोनिया भले । सदा गुंतले तेथेची ॥३१॥

प्रजा राजाचि विनयरीती । पाहता भैरव विस्मित होती । आपुलिया नावे लिंग निगुती । स्थापुनी तप करिती ते ॥३२॥

पाहोनि भैरवांची वाट । योगिनीस म्हणे नीलकंठ । तुम्ही जावोनिया चोखट । करा खटपट मत्कार्यी ॥३३॥

त्या म्हणती गा शंकरा । आम्ही उद्योग करोनि बरा । बाहेर काढोनि नरनाथवरा । तुज महेश्वरा नेऊ तेथे ॥३४॥

प्रतिज्ञा करोनिया योगिनी । येत्या जाहल्या काशीभुवनी । तेथे राजा प्रजा पाहुनी । विस्मित मनी जाहल्या ॥३५॥

म्हणती राजा पुण्यनिधी । हा न चळे येथून कधी । यासि अह्मापासोनि उपाधी । करिता विधी घडेना ॥३६॥

त्याही रमल्या काशीभुवनी । शंभू वाट पाहे निशिदिनी । कधी येतील कार्य साधुनी । त्याचे मनी तळमळ ॥३७॥

मग तेव्हा पयःफेनधवल । पाठविता जाहला दिक्पाल । ते काशीत येऊनि भूपाल । पाहता पावले मोहाते ॥३८॥

मग पाठविले ऋषीश्वर । ते येऊनि पाहती नरवीर । राये पाहता मुनिवर । करी नमस्कार प्रेमभरे ॥३९॥

करोनिया ऋषीचे पूजन । राये अर्पिले बहुत धन । वस्त्राभरणे ग्राम देऊन । मोहिले मन तयाचे ॥४०॥

ऋषी म्हणती परस्पर । हा तो राजा स्वधर्मपर । प्रजा पाळी निरंतर । धर्मनीतीने पुत्रापरी ॥४१॥

याचे राष्ट्रींच्या प्रजा सकल । स्वधर्मे राहटती पुण्यशील । तेथे आमुचा प्रयत्न फोल । होऊनि बोल लागे पै ॥४२॥

मग निजनामे लिंगे स्थापून । करिते जाहले अनुष्ठान । काशीवियोगे गौरीरंजन । अनुदिन संतापला ॥४३॥

मग करोनि विचार । सर्व पाठविले अमर । देव पातले काशीपूर । त्याही नरवीर पाहिला ॥४४॥

तव तो दिसे तेजोराशी । कदा न शिवे अधर्माशी । राष्ट्री प्रजांचे मानसी । अधर्मासि थारा नव्हे ॥४५॥

ऐसे पाहता सुर विस्मित । होवोनि तेथे राहिले समस्त । स्वनामे लिंगे स्थापोनि बहुत । तप करिती बहुसाल ॥४६॥

शंकरे त्याची वाट पाहिली । मग अवघ्यांची निराशा केली । चित्ती तळमळ सदा झगटली । आशा गुंतली काशीत पै ॥४७॥

मग शिवे सुविचार केला । येऊनि विनवी वक्रतुंडाला । तूच कारण या विश्वाला । हे मजला ठाऊक पै ॥४८॥

तू विश्वव्यापी विश्वेश्वर । तुझेनि जाहले चराचर । सर्वात्मा तू लंबोदर । करी उपकार मजवरी ॥४९॥

काशीवियोगे मज मानसी । तळमळ जडली अहर्निशी । तूच माझा कार्यकर्ता होशी । हे इतरांसि घडेना ॥५०॥

ऐसे ऐकता शंकरवचन । धुंडिराज बोले गर्जोन । दिवोदास राजा काशीतून । आता काढीन क्षणमात्रे ॥५१॥

होवोनि ज्योतिर्विद ते समयी । शंभूसि प्रदक्षणा करूनि पाही । काशीते जाऊनि लवलाही । विंदाण त्याणे मांडिले ॥५२॥

कनककांती तेजागळा । नवरत्नमाळा रुळती गळा । भाळी केशर वरी टिळा । घवघवीत कस्तुरीचा ॥५३॥

कर्णी कुंडले रत्नखचित । कनयमय यज्ञोपवीत । बत्तीस लक्षणे विराजित । मनमोहित ललनाचे ॥५४॥

मन्मथ होय स्वरूपी लज्जित । घवघवीत मुख शशी शोभत । जन पाहोनिया समस्त । दंडवत करिती पै ॥५५॥

त्रिकाळज्ञाने अतिसाजिरा । जन पाहुनी ज्योतिषी बरा । चरणी करोनि नमस्कारा । प्रश्न तयासी पूसती ॥५६॥

त्यांचे प्रश्न द्विजसुमती । सांगे तैसेच ते उतरती । कोणी येऊनिया युवती । म्हणे पती येईल कधी ॥५७॥

तयेस सांगे प्रश्न पाहुनी । तैसाच पातला पति सदनी । भक्तीस लागली नितंबिनी । आणीक मानिनी घेऊनिया ॥५८॥

कोणी म्हणे गा विप्रवरा । गर्भ न राहे माझे उदरा । ज्योतिषी तयेस आशीर्वाद त्वरा । देताच जाहली गर्भवती ॥५९॥

काय आशीर्वादाची करणी । वंध्या जाहल्या कितीक गर्भिणी । प्रत्यय पाहती नगररमणी । त्याचे चरणी लंपट ॥६०॥

विप्राचे पावता आशीर्वाद । जनाचे गेले कुष्टादि गद । स्त्रियांसि लागला त्याचा छंद । पतिपाद विसरल्या ॥६१॥

भलत्या मिषे येऊनि ललना । विलोकिती त्याचे सुंदर वदना । ध्यास लागला अवघ्या जना । मनोरंजना पाहोनिया ॥६२॥

वस्तू कवळोनि मुष्टीत । जन जेव्हा त्यासि पुसत । तेव्हा तो तत्काळ सांगत । होती विस्मित पुसणारे ॥६३॥

सांगे मनाचे चिंतिले सर्व । जन म्हणती हा होय देव । काय सांगावे याचे लाघव । ज्ञान सर्व याचेपासी ॥६४॥

ऐसा तीन मासपर्यंत । घरोघरींच्या पूजा घेत । द्रव्य मिळाले अपरिमित । ते वाटित उदारपणे ॥६५॥

कर्णोपकर्णी त्याची वार्ता । ऐकत्या जाहल्या राजवनिता । त्याही तयास पाचारिता । जाता जाहला गृही ॥६६॥

रत्नमय सिंहासनी । बैसविती तयास प्रार्थुनी । पूजा करिती नितंबिनी । मनोभावे करोनिया ॥६७॥

पाहता त्याचे सुंदर वदन । राजकांता जाहल्या तल्लीन । कंदर्पदर्पे विव्हल होऊन । लागले ध्यान तयाचे ॥६८॥

प्रतिदिनी आणोनि तयाशी । पूजिती पाहती वदनशशी । कोणी तयाचे चरणाशी । कोमल करे क्षाळिती ॥६९॥

केशरे भरोनिया वाटी । कोणी अंगासि लावी उटी । एक येऊनिया गोरटी । घाली कंठी रत्नमाला ॥७०॥

कोणी एक येवोनि बाला । तिणे आवडीने तांबूल दिल्हा । विड्या करोनिया त्याला । एक देत घडोघडी ॥७१॥

प्रश्न पुसता तयाशी । लागलच ये प्रत्ययाशी । दिवसेंदिवस तयाशी । वेड लागले तयाचे ॥७२॥

सदा गुंतला राजमंदिरी । तळमळती नगरनारी । क्षणभरी येता निजमंदिरी । भोवती सुंदरी नागरिक ॥७३॥

विप्र पाहावया प्रतिक्षणी । होय जनाची मंडपघसणी । पुन्हा नेती राजरमणी । निज मंदिरी पूजावया ॥७४॥

राजकांता सुमनमाळा । येऊनि घालिती त्याचे गळा । हा वृत्तांत रायासि कळला । तेणे नेला सभास्थानी ॥७५॥

बैसवोनिया सिंहासनी । षोडशोपचारे पुजुनी । रूप पाहता त्याचे नयनी । जाहला मनी विस्मित ॥७६॥

मित्राहूनि तेजागळा । राजा पाहता चंकित जाहला । म्हणे ऐसा विप्र भला । नाही देखिला दूसरा हो ॥७७॥

नानाविध प्रश्न तयाशी । विचारिता सांगे तेजोराशी । राजा जाणोन प्रत्ययाशी । लागे चरणासी पुनःपुनः ॥७८॥

अनर्घ्यरत्ने वस्त्रावरण । ग्रामरथ वाजीवारण । राये देता बोले ब्राह्मण । तयाकारणे हास्यमुखे ॥७९॥

मज नाही दाराघर । न लगे धन रत्ने कुंजर । तुझी भक्ती निरंतर । पाहोनिया संतोषलो ॥८०॥

आता सांगतो तुजला एक । ते माझे निश्चये ऐक । तेणे पावशील परमसुख । येथे आणि परत्र पै ॥८१॥

आजपासून सत्रावे दिवसी । विप्र पावेल वाराणशी । त्याचे ऐकोनिया वचनासी । तैसे जनाशी वर्तवणे ॥८२॥

तूही तयाचे मानी वचन । तेणे होशील परमपावन । तुटोनिया भवबंधन । समाधान होईल तुझे ॥८३॥

ऐसे जरी तुवा केले । तरी मज हे सर्व पावले । राजा त्याची शिवोनि पाउले । बहुत भले करीन म्हणे ॥८४॥

ऐसे सांगोन राजयाशी । धुंडीभट शिवदर्शनाशी । जाता विष्णू वाराणशी । जाता विष्णू वाराणशी । प्रवेशता जाहला ॥८५॥

बौद्धरूपी मनमोहन । संगे कन्या कमलारत्न । घेऊनिया काशीत राहून । मांडिले विंदान तयाने ॥८६॥

वेदास विरुद्ध मत काढिले । ते अवघ्या जनास तेणे दाविले । ब्राह्मणादि पाहून भुलले । करू लागले आचार तसा ॥८७॥

बौद्ध सांगे सद्विप्रांशी । काढोनिया शास्त्रार्थाशी । मोडोनिया साकार भजनाशी । म्हणे निगुर्णाशी भजावे ॥८८॥

ते मानवले जनालागुनी । सर्व जाहले नास्तिकाभिमानी । आपले ह्रदयी देव मानुनी । अग्निहोत्रे टाकिली ॥८९॥

महा लाघवी तो माधव । नास्तिकवादी केले सर्व । वेदविहित धर्मभाव । सकल मानव सोडिती तदा ॥९०॥

कमला मिळवोनिया स्त्रियांचा मेळा । तिणे घातली जारकर्मशाळा । युवतीस म्हणे तयेवेळा । ऐका अबला सर्व तुम्ही ॥९१॥

आपला पति आणि परनर । हे न मानावे गे साचार । सर्वाभूती एक ईश्वर । निरंतर भरला असे ॥९२॥

सांडोनिया तुम्ही व्रीडा । परपुरुषांसि करा क्रीडा । मनातील संशय आता दवडा । करा धडा मानसाचा ॥९३॥

मान देवोनि तिचे वचनासी । कामिनी रमती परपुरुषाशी । जाहल्या काशीत दुष्कृतराशी । मग बौद्धाशी फावले ॥९४॥

बौद्धभट येऊनि राजमंदिरी । दिवोदासाते बोध करी । म्हणे पाप संचले तुझे नगरी । याचा तरे विचार पहा ॥९५॥

पुण्यक्षेत्र ही वाराणशी । येथे वास पुण्यजनाशी । राज्यांती नरक भोगणे तुजशी । हे आम्हासि कळो आले ॥९६॥

तुझे हित सांगतो तुला । आता सांडूनि रे राज्याला । तुवा जावे तपोवनाला । होईल तुजला मोक्षसुख ॥९७॥

विश्वेश्वराचा प्रसाद होता । तू पावशेल महद्भाग्यता । ऐसे बोलोनिया तत्वता । जाहला धरिता निजरूप ॥९८॥

चतुर्भुज श्यामसुंदर । कासे विराजे पीतांबर । शंखचक्रगदाधर । भाळी केशर नाम साजे ॥९९॥

ऐसा पाहता मनमोहन । आठवले धुंडीभटाचे वचन । मग पदाब्जाते मिठी घालुन । होत लीन भ्रमर जैसा ॥१००॥

त्यासि ऐसा बोध करून । गुप्त जाहला मधुसूदन । दिवोदास राज्य त्यागुन । ज्ञानसंपन्न जाहला ॥१॥

धुंडीविनायक म्हणे पिनाकीशी । चला वसवा आता काशी । त्याचे वचन ऐकता शंकराशी । प्रमोद मानसी जाहला ॥२॥

घेऊनिया अपर्णागण । केले नंदीवरी आरोहण । वाराणशीत भोगोभूषण । परमाल्हादे प्रवेशला ॥३॥

दिवोदासावरी कृपा करून । निजपदी केले स्थापन । लीलाविग्रही गौरीरंजन । न कळे लीला तयाची ॥४॥

गृत्समद म्हणे वो राजकामिनी । शिवे गंडकी शिळा आणुनी । धुंडीमूर्ती त्याची करुनी । काशीद्वारी स्थापियेली ॥५॥

शिवे दीधला वर तयेशी । माघकृष्णचतुर्थी भौमवार निशी । जो पुजील या मूर्तीशी । मुक्तिभुक्ति तयासि होय ॥६॥

शमीपत्रे करिता पूजन । तुझा उठेल नंदन । प्रसन्न होता गजवदन । सुखसंपन्न नांदणे ॥७॥

ऐसी तीते सांगोन कथा । गृत्समद गेला तत्वता । काशीत गेली राजकांता । करी व्रत चतुर्थीचे ॥८॥

माघमासी भौमवासरी । कृष्णचतुर्थी जी साजिरी । तद्दिनी भावे राजसुंदरी । अर्चन करी यथाविधी ॥९॥

शमीदूर्वांकुरे पूजन । करिता जाहला धुंडी प्रसन्न । तीते देऊनिया दर्शन । वरदान समर्पिले ॥१०॥

तेथूनि निघाली कीर्तीसती । पुत्रासमवेत नगराप्रती । येता आनंदोनि भूपती । नेली नगरात मिरवीत पै ॥११॥

भांडार फोडोनि नगराधिपे । याचक सुखी केले साक्षेपे । कृपा करिती गणाधिपे । दुःख हरपे तत्काळ ॥१२॥

राये गौरवोनि निजकांता । मग तीते नेली एकांता । सुरतानंदे दोघे क्रीडता । वियोगबाधा हरपली ॥१३॥

जयजयाची मनमोहना । भक्तरक्षका गजानना । तुझी लीला सहस्त्रवदना । करिता गणना नयेची ॥१४॥

स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराणसंमत । क्रीडाखंड रसभरित । एकादशोध्याय गोड हा ॥१५॥

श्रीगजाननार्पणमस्तु ॥ अध्याय ॥११॥