श्री गणेश प्रताप

सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.


क्रीडाखंड अध्याय १३

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।

जय सुरुचिर सिंदूरभूषणा । त्रैलोक्यपते गजकर्णा । जे स्मरती तुझिया चरणा । भवभयमरणा चुकती ते ॥१॥

तू तव अनंतब्रह्मांडनायक । मी रंक उभा द्वारी एक । तुझी कृपादृष्टी होता सकळिक । मनोरथ पुरतील माझे ॥२॥

मद्वासना पूर्ण जाहल्याविण । तुझे न देखो दृढचरण । देवा यालागी परिपूर्ण । आशा माझी करणे तुवा ॥३॥

द्वादशोध्यायाचे अंती । घरोघरी भोजन भक्तपती । काशिराजा समवेत अनंतमूर्ती । होवोनि गणपती करीतसे ॥४॥

तेथोनि येता राजधामी । तेणे केले नरांतक दूत श्रमी । त्यांची तामस गुणोर्मी । हरोनिया रक्षिले तेणे ॥५॥

मग ते नमूनि कश्यपनंदना । जाते जाहले दैत्येश भुवना । येऊनिया सभास्थाना देवांतकाशि नमिती ते ॥६॥

दूत म्हणती दानवपती । बाल नव्हे तो आदिमूर्ती । अप्रमेय अनंतशक्ती । आहे गणपती प्रत्यक्ष ॥७॥

काशिराजा समवेत । धरोनि अनंतमूर्ती निश्चित । गृहीगृही जेविला अनंत । नाही अत तयाचा ॥८॥

आम्ही तयासि करावया विघ्न । जपत होता अनुदिन । शिबिकारूढ भगवान । पाहोन प्रयत्‍न मांडिला ॥९॥

परी त्याचे अदुत बळ । तेथे आम्ही जाहलो निष्फळ । आम्हासि रक्षिता जाहला दयाळ । म्हणोनि चरणकमळ हे देखिले ॥१०॥

जे जे तुवा दैत्य धाडिले । ते ते निजबळे तेणे मर्दिले । पुन्हा नाही सांगो आले । वर्तमान तुजलागी ॥११॥

करावया भूभारहरण । अवतरला गजकर्ण । हे धरोनिया तुवा स्मरण । करी कल्याण आपले ॥१२॥

ऐसी त्याचे मुखींची वार्ता । नरांतक ऐकोनि करी चिंता । सभेत उठोनि अवचिता । जाहला गर्जता आवेशे ॥१३॥

दूतासि म्हणे तेव्हा असुर । कायसा मनुज विप्रकुमर । त्याचा सांगता बडिवार । रायासमोर निर्लज्जपणे ॥१४॥

आता पाहे पराक्रम । विनायकासहित राजा अधम । जिंकोन आणोन दैत्यसत्तम । पाहे कर्म अद्भुत माझे ॥१५॥

दिनकराचे प्रभेपुढे । खद्योत कायसे बापुडे । त्याचे कर्म त्यास कुडे । माझे करे पावले पै ॥१६॥

चढवोनिया विशाळ भुकुटी । दाढा खावोनि कडकडाटी । नमन करी पदसंपुटी । देवांतकाचे तेधवा ॥१७॥

घेवूनि चातुरंग सेना । त्वरे पातला करीत गर्जना । देव पळविते विमाना । धरोनि मनी भय त्याचे ॥१८॥

काशीपतीशी राजदूत । येऊनि सांगती वृत्तांत । नरांतक दैत्य अद्भुत । वाहिनीसहित पातला ॥१९॥

जैसा प्रळयकाळी सरित्पती । बुडऊ पाहे गावसुमती । तैसा आता नगराप्रती । प्रळयकाळ वोढवला ॥२०॥

राजा करीत होता भोजन । ऐकोन उठला वर्तमान । सेनापतीस पाचारुन । आज्ञा करी तयासी ॥२१॥

रथ सज्जून त्वरे आणा । घाव घालावा निशाणा । जाणे आहे आता रणा । नाही मरणा भीत मी ॥२२॥

विनायकाचे प्रसादे करून । करीन दैत्यांचे कंदन । राये वस्त्राभरणे अर्पुन । गौरविला सेनापती ॥२३॥

करुन विनायकाचे पूजन । चातुरंगसेना सवे घेऊन । रणवाद्ये वाजऊन । नगराबाहेर निघाला ॥२४॥

येऊनि नगराबाहेरी झडकरी । अवलोकिले सुरवैरी । ते भासले काळापरी । भय अंतरी संचरले ॥२५॥

अद्भुत गर्जती निशाचर । तेणे थरारे चराचर । धुळीने लोपविला दिनकर । अंधकार पडला पै ॥२६॥

राजा पाहोनि भयविव्हळ । अमात्य बोलती तयास बोल । विपरीत दिसतो आता काळ । दैत्यपाल कोपता ॥२७॥

सामदामदंडरीती । करूनिया नानायुक्ती । शत्रूपासोनि आपली स्थिती । पाहिजे रक्षिली येधवा ॥२८॥

शेखी अर्पोनि विनायका । आता रक्षावे सकळ लोका । हा विचार ऐक निका । तरीच सुखा पावसील ॥२९॥

बृहस्पती अमात्यवचन । ऐसे सकल ऐकून । म्हणती साधू तयालागुन । बुद्धिमान अद्भुत हा ॥३०॥

इतकियांत अमात्य कोणी । सांगे नगरातील कहाणी । दैत्य धरोनि नेल्या तरुणी । अति सुंदर आतांची ॥३१॥

नगरी मांडिला प्रळय थोर । कुल स्त्रियांसि रमती असुर । कितीक स्त्रियानी कलेवर । त्यागिजेली असुरभये ॥३२॥

दैत्यी लावोनिया वैश्वानर । बहुतेक जाळिले नगर । काय पाहता विचार । व्हा समोर झुंजावया ॥३३॥

राजा करोनि जिवाचा धडा । सेनेसहित लोटला पुढा । दैत्य खावोनिया दाढा । तया उजू लोटले ॥३४॥

रणवाद्ये वाजती कर्कश । दोही दळा चढला आवेश । कोपे खवळला नरेश । तेणे धनुष्यास सज्ज केले ॥३५॥

असुर घेऊनि नागवी ओढणे । कितीक भिडती तरुपाषाणे । कितिएक मार बाणे । राजसेनेसी करिती हो ॥३६॥

दैत्य आरडती विक्राळ । तेणे थरारे उर्वीमंडळ । कल्पांतवत खवळले खळ । युद्ध तुंबल मांडिले ॥३७॥

काशीपतीच्या तिखटबाणी । पडल्या राक्षसांच्या श्रेणी । पुढे पाय न ठेविती कोणी । असुर रणी माघारले ॥३८॥

कितीकांचे तुटले चरण । कितीकांचे छेदिले कर्ण । रथ मोडले दारुण । असुरगण चरफडती ॥३९॥

दैत्य घायाळ होवोनि । प्राणत्यागी मागती पाणी । पुरे जाहले कितीक रणी । पळती कोणी प्राणभये ॥४०॥

सांडोनि युद्धाचे स्थळ । असुरसेनेस सुटला पळ । हे पाहोनिया दैत्यपाळ । मुख्य वीरा दवडी पुढे ॥४१॥

शतसहस्त्र महावीर । राक्षस उठावले समोर । त्याही केला भडमार । राजसेनेस तेधवा ॥४२॥

बाणासि बाण झगडता । वन्ही पडे सेनेवरता । लोपोनि गेला न दिसे सविता । अंधकार दाटला पै ॥४३॥

दैत्यांचा पाहोनि पराक्रम । राजसेनेस दाटला क्लम । वळंघोन चालविला राजसत्तम । अमात्य कुमरासमवेत ॥४४॥

रायासि नेले धरुनी । राजकांता ऐसे ऐकुनी । अंग टाकोनिया मेदिनी । करी कामिनी शोक बहू ॥४५॥

ह्रदय पिटोनिया करे । हंबरडे दीर्घस्वरे । हे पाहोनिया अदिती कुमरे । धरिला त्वरे कोप बहू ॥४६॥

सिद्धीस म्हणे विनायक । काय पाहशी गे तू कौतुक । तिणे वीर अलोलिक । उत्पन्न केले तेधवा ॥४७॥

महाभयंकर गाढे वीर । उत्पन्न केले तिणे अपार । त्यात एक मुख्य सरदार । करिता जाहला थोर गर्जना ॥४८॥

करूनि विनायकासि नमन । म्हणे क्षुधा लागली मजलागुन । विनायक बोले हास्यवदन । करी भक्षण राक्षसचमू ॥४९॥

तथास्तु म्हणोन ते समयी । राक्षस सेनेवरी लोटला पाही । मुख पसरोनि लवलाही । सेना स्वाहा करीतसे ॥५०॥

गज तुरंगावरी बैसले । उचलोन मुखी तयांस टाकिले । गजरथअश्व भक्षिले । असुर भ्याले पाहता ॥५१॥

हाहाःकार करिती असुर । पुरुष करीत चालला संहार । हे पाहोन तेव्हा नरांतकवीर । म्हणे कृतांत दूसरा हा ॥५२॥

कोपे खवळला नरांतक । लक्षानुलक्ष सोडी सायक । ते रोमकूपी शिरोनि देख । गुप्त होती तयाचे ॥५३॥

नाना शस्त्रे दैत्य टाकी । तितुकी भक्षित महापुरुष की । आश्चर्य करिजे वृंदारकी । सामर्थ्य पाहूनि पुरुषाचे ॥५४॥

सरले शस्त्रास्त्र सायक । क्षीणशक्ती नरांतक । पृष्ठी देवोनिया देख । पळता जाहला प्राणभये ॥५५॥

धरिती गणेशगण धाउनी । केशी धरोनि पाडिती मेदिनी । नरांतकासि पाशे बांधुनी । आणित जाहले पुरुषापाशी ॥५६॥

काशिराजासमवेत । सकळ सेना पुरुष भक्षित । नरांतक धरोनिया जित । परतता जाहला पुरुष तो ॥५७॥

येऊनिया विनायका जवळी । नमन करोनि पादकमळी । करोनिया बद्धांजळी । विनवीतसे पुरुष तो ॥५८॥

म्हणे तवाज्ञानुसार दैत्यसेना । संपूर्ण भक्षिली जगज्जीवना । नरांतका हा याचे जीवना । कश्यपनंदना हरी तू ॥५९॥

आता मी श्रमलो भारी । निद्रा कोठे करू तरी । विनायक म्हणे माझा उदरी । सुखे शयन करावे ॥६०॥

ऐसे बोलता जगदीश । पुरुष मुखी करी प्रवेश । पाहतसे असुरेश । सकल माया तयाची ॥६१॥

जैसा अवनीपासोनि गंध जाहला । पुन्हा तिचे ठायी मुराला । तैसा विनायकचि जाहला । महापुरुष क्षणार्धे ॥६२॥

काशिराजा अमात्यपुत्र । विनायकाचे ह्रदयी पवित्र । पाहती रचना चित्रविचित्र । अनेक ब्रह्मांडांच्या पै ॥६३॥

अनेक सूर्य अनेक चंद्र । ब्रह्माविष्णूयमइंद्र । नाना लोक भद्राभद्र । पाहता भुलले मन त्याचे ॥६४॥

अगम्य ईश्वराचा महिमा । जाणोन स्तविती पुरुषोत्तमा । न कळे तुझी गुणगुण सीमा । वेदालागी जगदीशा ॥६५॥

येथोन आता करी मोचन । ऐसी त्याची भक्ती पाहुन । बालवेषे गजानन । मार्ग दावी तयासी ॥६६॥

रोमरंध्रे पडले बाहेर । विनायका जवळी साचार । उभे पाहती आपले घर । संचले नगर जैसे तैसे ॥६७॥

जोडोन हात काशीपती । विनायकाची करी स्तुती । काय माया जगत्पती । तुझी अपूर्व देखिली ॥६८॥

त्याचे मस्तकी कृपा कर । ठेविता जाहला अदितिकुमर । तेणे रायासि कळला विचार । विनायकाचे मायेचा ॥६९॥

मग राजा निजमातेपाशी । येऊनि वंदी तिचे चरणाशी । जावोनिया ललनेपाशी । भेटे तिसी प्रेमभरे ॥७०॥

नरांतक विनायकाची भक्ती । पाहोन विस्मय करी चित्ती । म्हणे हा अनंतशक्ती । मुक्तिभुक्ति देणारा ॥७१॥

याचे हस्त पावता मरण । जन्ममृत्यू भय नसे दारुण । मग बोले तेव्हा गर्जुन । विनायकासी तेधवा ॥७२॥

तुवा करोनि इंद्रजाळ । दैत्य आटले सकळ । तुझी माया मजशी विकळ । होईल रे क्षणार्धे ॥७३॥

जेव्हा चढवीन मी भ्रुकुटी । तेव्हा आटीन सकल सृष्टी । हे जाणूनि बालक दृष्टी । व्यर्थ वैर वाढविले ॥७४॥

विनायक म्हणे रे चावटा । किती बोलसी वटवटा । दावी वीरवृत्तीच्या लाटा । मरण वाटा जाऊ नको ॥७५॥

चमू भक्षिली पुरुषे जेव्हा । काय सामर्थ्य जाहले तेव्हा । आता तुझी बरळे जिव्हा । मरणसमयी विपरित ॥७६॥

ऐसी ऐकता विनायकवाणी । दैत्य भ्याला अंतःकरणी । धैर्य धरोनिया ते क्षणी । कापवी गर्जुनी भुगोळ ॥७७॥

गर्जना ऐकता काशीपती । धनुष्यबाण घेतला हाती । दैत्य धावोनि चपळगती । चाप मोडुनी टाकितसे ॥७८॥

हे पाहोनि कश्यपात्मज । अंकुश घेऊनि धावे सतेज । दैत्यमस्तकी हाणी सहज । दैत्य पडला मूर्च्छित पै ॥७९॥

पुन्हा होवोनिया सावध । दोन पर्वत घेऊनि सुबद्ध । विनायकाचा करावया वध । पर्वत टाकी तयावरी ॥८०॥

विनायके परशुघाते । पिष्ट केले पर्वताते । हे पाहोनि तेव्हा दैत्यनाथे । शस्त्रे सोडिली अपार पै ॥८१॥

क्षणात धरी नानावेष । माया निर्मी दैत्येश । तितकियांचा करी नाश । करूनि आवेश गणपती ॥८२॥

दोघांसि चढला रणमद । करू लागले मल्लयुद्ध । करिती परस्पर ह्रदयभेद । सुरवृंद पाहती वरी ॥८३॥

चमकती उडती आकाशगती । पुन्हा येती पृथ्वीवरती । परस्परांते पाडिती । घाय घालिती वर्मस्थळी ॥८४॥

घडोघडी पडती मूर्च्छित । विनायकासि मूर्च्छना बहुत । दाटली तिणे जैसा मृत । पडता जाहला भूमीवरी ॥८५॥

विनायक पावला निधन । ऐसे काशीपतीस वाटून । करीत जाहला पलायन । जीवितभये करोनिया ॥८६॥

मनी म्हणे कश्यपकुमर । आता काय करावा विचार । कैसा मरण पावेल असुर । संकट थोर पडले मज ॥८७॥

हा नामे तो नरांतक । देवा सहित मजला अंतक । जाहला हे कौतुक । वर्णिजेते येधवा ॥८८॥

ऐसी करीत आहे चिंता । तव चापतूणीर अवचिता । पडता उठोनि जगत्पिता । घेता जाहला निजकरी ॥८९॥

सूर्यापरी ज्याचे तेज । करोनिया त्यास सज्ज । ठाण मांडी कश्यपात्मज । मानी असुर वधिला मी ॥९०॥

सोडोनिया दोन बाण । असुराचे भुज दारुण । छेदिता जाहला न लगता क्षण । गजकर्ण तेधवा ॥९१॥

सिंहनादे अदितिकुमर । गर्जे तेव्हा भयंकर । कापे तेव्हा चराचर । शेष शिरे सावरी बळे ॥९२॥

असुराचे छेदिता भुज । पुन्हा फुतले ते सहज । लक्षोनिया कश्यपात्मज । वृक्ष घेऊनि असुर धाविन्नला ॥९३॥

शरघाते वृक्षपर्वत । विनायक तेव्हा चूर्ण करित । दोनी चरण तेव्हा छेदित । आक्रोशे गर्जत असुर तेव्हा ॥९४॥

पुन्हा फुटले तयास पाय । आश्चर्य करी गणराय । म्हणे न दिसे बरी सोय । आणीक उपाय मांडिला ॥९५॥

असुर गर्जे निराळी । तेव्हा भिवोन अमरमंडळी । पळती जाहली एकवेळी । गिरिकंदरी तेधवा ॥९६॥

तरुवृक्षपर्वताचा मार । विनायकावरी करी असुर । दाढा खातसे करकर । मुख भयंकर पसरीतसे ॥९७॥

विनायके एकबाण । चापी लावोनिया दारुण । अग्नि स्थापिला मुखी तयान । आकर्णवरी ओढिला ॥९८॥

नेटे सोडिला जेव्हा शर । अवनी कापे तेव्हा थरथर । भयविव्हळ जाहले चराचर । म्हणती प्रळय मांडिला ॥९९॥

चपल वेगे जाऊनि शर । छेदी असुराचे शिर । उडोनिया सत्वर । पावले पुर रौद्रकेतूचे ॥१००॥

परी पुन्हा फुटले होते तसे । असुर तेव्हा गर्जतसे । देव म्हणती जाहले कैसे । दैत्य भासे कृतांतवत ॥१॥

लक्षसंख्या त्याची शिरे । छेदिली तेव्हा अदिति कुमरे । परी कदा दैत्य न मरे । विनायक चमत्कारे मानसी ॥२॥

मग कोपोनिया विश्वपती । धरी विश्वरूपाची स्थिती । स्त्रीपुंनपुंसकाची आकृती । नाहीच जाहली विनायकी ॥३॥

चकित जाहला पाहोनि असुर । न दिसे प्रकाश अंधकार । कोठे न दिसे कश्यपकुमर । निशाचर घाबरला ॥४॥

शिववरदानाचे स्मरण । होता म्हणे आले मरण । तव येवोनिया दिव्यबाण । शिर छेदी तयाचे ॥५॥

असुर पडला धरणीवरी । देव गर्जती जयजयकारी । पुष्पवृष्टी विनायकावरी । असुरवैरी करिताती हो ॥६॥

राजा येवोनिया धावत । विनायकपादसरोज नमित । विजयी जाहला अदितिसुत । प्रमोद बहुत विस्तारला ॥७॥

राजा फोडोनि भांडार । सुखी केले याचक नर । शृंगारिले तेव्हा नगर । आनंद थोर घरोघरी ॥८॥

जयजयाजी विश्वंभरा । भक्तवत्सला अदितिकुमरा । मज उद्धरावे पामरा । कृपार्णवा गणेशा ॥९॥

स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराणसंमत । क्रीडाखंड रसभरित । त्रयोदशोध्याय गोड हा ॥१११॥ अध्याय ॥१३॥ ओव्या ॥११०॥