श्री गणेश प्रताप

सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.


क्रीडाखंड अध्याय १४

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।

ॐ नमोजी सनातना । पूर्णानंदा कश्यपनंदना । निजभक्त मनोरंजना । लागो मना ध्यास तुझा ॥१॥

पूर्वाध्यायी हेचि कथन । विनायके नरांतक हनन । केले पुढे सावधान । कथानुसंधान परिसावे ॥२॥

नरांतकाचे शिर । छेदिता उडाले सत्वर । ते अंगणी साचार । रौद्रकेतूचे पडियेले हो ॥३॥

शारदानामे नरांतक जननी । निजली होती सुखशयनी । तव शीर पडले अंगणी । किरीट कुंडला समवेत ॥४॥

त्याचा ऐकोन नाद त्वरित । शारदा धावली सख्यांसहित । तिणे पाहता शीर रडत । ह्रदय पिटीत निजकरे ॥५॥

गडबडा लोळे धरणीवरी । पाषाण हाणी उरीशिरी । भोवत्या मिळाल्या निशाचरी । त्याही दीर्घस्वरी रडताती ॥६॥

त्यांचा ऐकोन शोक भारी । रौद्रकेतू ये लवकरी । तोही अद्भुत शोक करी । काया अवनीवरी टाकोनिया ॥७॥

घेऊनि नरांतकाचे शीर । शारदारौद्रकेतू सत्वर । देवांतकापासी साचार । करिती शोक आक्रोशे ॥८॥

पाहता बंधूचे निधन । देवांतक करी रुदन । म्हणे पाठीराखा मज त्यागुन । स्वर्गभुवनी गेला कैसा ॥९॥

ज्याते पाहूनि इंद्रादि सुर । टाकोन पळती निजमंदिर । त्याते आज कोण मारणार । तो सत्वर सांगारे ॥१०॥

सेवक म्हणती दैत्यपती । काशिराजा तो दुर्मती । तेणे आणिले विनायकाप्रती । लग्नालागी निजगृही ॥११॥

तेणे मारिले नरांतकाला । ऐकता देवांतक क्षोभला । सैनिकांस म्हणे आता चला । मारीन त्याला निजबळे ॥१२॥

करोनि पितयांसि नमन । युद्धास निघाला तेव्हा जाण । नभोमार्गे दैत्य येऊन । वेढितो नगर राजयाचे ॥१३॥

दैत्य करिती सिंहनाद । सेवक पाहोनि सखेद। काशीपतीस म्हणती भेद । आता होतसे नगराचा ॥१४॥

भ्रातृकैवारे देवांतक । घेऊनिया दैत्य अनेक । युद्धासि पातला नरनायक । ऐकता भूप घाबरला ॥१५॥

चिमणा बाळकाचा मेळ । मध्ये खेळे अदिती बाळ । राजा येऊनि उतावीळ । म्हणे काळ पातला आम्हा ॥१६॥

नरांतकाचा बंधु प्रबळ । देवांतक पातला दुष्ट खळ । ऐसे ऐकता कश्यपबाळ । आश्वासित भूपाते ॥१७॥

राया तुवा असावे स्वस्थ । पराक्रम माझा पाहे अद्भुत । ऐसे बोलोनि अदितिसुत । सिंहारूढ जाहला ॥१८॥

परशांकुश धनुष्यशर । त्याही मंडित चारीकर । सिद्धिबुद्धीसहित लंबोदर । आकाशपंते चालला ॥१९॥

विनायके सिंहनाद केला । तेणे भूगोळ कापू लागला । देवांतकह्रदयी संचारला । महाकंप तेधवा ॥२०॥

नानाविध दैत्यवाहिनी । पाहोन गणेश सिद्धीलागुनी । म्हणे तू सुयोध निर्मुनी । दैत्य कंदनी सादर हो ॥२१॥

ऐकता पतीचे ऐसे वचन । सिद्धी त्याचे पाद वंदून । करावया दानवमर्दन । निघे तेथून लवलाही ॥२२॥

सिद्धीने केली जेव्हा गर्जना । कापू लागली दैत्यसेना । वीर उत्पन्न जाहले नाना । शस्त्रास्त्रा समवेत ॥२३॥

गजाश्वरथ पादचारी । वीर देखिले रणाधिकारी । वर्षाकाळी नद्यांचे परी । असुरावरी सर्सावले ॥२४॥

रणवाद्ये कर्कश वाजती । वीर शस्त्रास्त्रे वर्षती । ऐसे पाहता दैत्यपती । विचार करी तेधवा ॥२५॥

एकला एक होता बालक । अकस्मात सेना जाहली अनेक । न कळे त्याच्या मायेचे कौतुक । होईल निःशंक नाश आता ॥२६॥

सिद्धीने जेव्हा स्मरण केले । अष्टसिद्धी येऊनि वंदिती पाउले । सिद्धीने जैसे कथिले । अष्टसिद्धींनी केले व्यूह तैसे ॥२७॥

पाहता व्यूहाकार देवसेना । सैनिक मागती तेव्हा आज्ञा । देवांतक म्हणे माझे मना । मानले आता रणास जा ॥२८॥

रथाकृती व्यूह पाहून । कर्दमासुर जाय धाऊन । चक्रव्यूही दीर्घदंताभिधान । दैत्य शिरोन युद्ध करी ॥२९॥

सिद्धीने जे अष्टव्यूह केले । त्यामाजी दैत्य शिरले । तेथे तुमुल युद्ध जाहले । असुर पडले असंख्यात पै ॥३०॥

युद्ध मांडले घोरांदर । दैत्य मेले जे अपार । शुक्र उठवी त्यांस सत्वर । विद्याबळे करोनिया ॥३१॥

इशितोसि दूत सांगते । जे रणी दैत्य मरती । ते शुक्र उठवी शीघ्रगती । ऐकता इशिता क्षोभली ॥३२॥

तिचे क्रोधापासून उद्भवली । कृत्या पुढे उभी राहिली । इशितेची आज्ञा घेतली । मग पातली शुक्रापासी ॥३३॥

तिणे शुक्र उचलोनि वेगी । घालिती जाहली निजभगी । तेथूनि ती निघाली त्याप्रसंगी । मग गेली पश्चिमेकडे ॥३४॥

तेथे बगांतून भार्गवाशी । टाकिती जाहली कृत्या वेगेशी । तेव्हापासोन त्या देशाशी । बर्बर ऐसे बोलती पै ॥३५॥

कृत्येने नेता उशनाशी । आनंद जाहला सिद्धिसैन्याशी । त्याही संव्हारिले दैत्य सैन्याशी । दैत्य पळती दशदिशा ॥३६॥

प्राकाम्यानामे सिद्धीपाशी । कालांक करी युद्धाशी । तेणे जिंकिता तयेशी । वशिता वेगेशी धावली ॥३७॥

तिणे उचलोन अद्रिशृंग । टाकिता जाहला राक्षसभंग । कालांतक चूर्ण होता सांग । दानव करी हाहाःकार ॥३८॥

पाहता निजसेनेची हानी । मुसल आणि शलभ दोनी । अणिमादि सिद्धी चौघीजणी । त्याही पडखळल्या संग्रामी ॥३९॥

प्राकाम्या घेऊनि चापशर । उठावली दैत्य सैन्यावर । युद्ध मांडले घोरतर । दैत्यी अमर संव्हारले ॥४०॥

दानवी प्राकाम्या केली जर्जर । देवसेनेमाजी हाहाःकार । ऐसे ऐकता सत्वर । सिद्धी इतर धाविल्या ॥४१॥

इशितावशिताविभूती । प्राकाम्येचे साह्य करिती । पर्वत शृंग उपटोन घेती । मग टाकिती असुरांवरी ॥४२॥

पडता शिखर अंगावर । चारी दैत्य जाहले चूर । त्यांची सेना पळे सत्वर । वीरवृत्ती सांडोनिया ॥४३॥

अणिमेने धावोन लवलाही । कर्दमासुराची शिखा ते समयी । धरोनि हापटिता ते पाही । शतचूर्ण तोही जाहला ॥४४॥

रणी माजला युद्धमहिमा । लघिमा गर्जे तशीच महिमा । धाव घेवोनि आली गरिमा । युद्धसीमा मांडली ॥४५॥

त्यावरी रथारूढ महाअसुर । तिघे पातले सोडीत शर । सिंहनादे भरिले अंबर । प्रळय थोर करिती रणी ॥४६॥

तालजंघ आणि दीर्घदंत । यक्ष्मासुर तेथे निकुरे भीडत । महिमादि सिद्धी अत्यद्भुत । युद्ध करिती अतिनिकुरे ॥४७॥

घटासुर आणि दुर्जय । रक्तकेश तो महाकाय । हे तीन दानव निर्भय । त्याही अपाय बहू केले ॥४८॥

घेऊनिया निजसेना । करिते जाहले सुरकंदना । त्यावर वशितादि सिद्धी आनंदमना । धावत्या जाहल्या रणमदे ॥४९॥

मारोनिया मुष्टिघात । तिघा असुरांचा प्राणांत । करित्या जाहल्या सिद्धी तेथ । सैन्य पळत तयांचे ॥५०॥

जय विनायक जय विनायक । म्हणोनि गर्जती सिद्धी देख । पुन्हा सर्सावले दैत्य चोख । धरिती हरिख युद्धाचा ॥५१॥

दोन्ही सैन्यास चढला मद । करिती परस्पर प्राणभेद । वीरांचे तुटले करपाद । जाहला आमोद नारदासी ॥५२॥

अहोरात्र जाहला संग्राम । ऐसे दिवस तीन उत्तम । देवदैत्यांचे युद्धकर्म । जाहले निःसीम तेधवा ॥५३॥

केशशैवालराजिता । वाहती रक्ताच्या सरिता । गजप्रेते सुरत्यांत तत्वता । प्रेते तीच काष्टे पै ॥५४॥

सर्प तेथे चापदंड । बाणमत्स्य वाहती उदंड । रथतारू ध्वजशीड । रणनिर्भीड वीर वरी ॥५५॥

रणी न दाखविता पाठ । जे जे मेले वीरसुभट । ते ते त्यागोन संसारकष्ट । स्वर्गी स्पष्ट पावले ॥५६॥

विमानी घालोनि देवगणी । त्रिविष्टपी नेल्या वीरश्रेणी । असुर माघारले रणी । सिद्धीज वीरी तेधवा ॥५७॥

सिद्धी करिती जयजयकार । देवांतक जाहला चिंतातुर । म्हणे कैसे विपरीततर । प्रालब्धे साचार जाहले ॥५८॥

स्त्रियांनी करोनिया रण । संहारिले असुर दारुण । आता झुंजोनि मी निर्वाण । नेईन धरोनि विनायका ॥५९॥

ऐसा करोनिया विचार । गर्जना करी वारंवार । तेणे कापती सुरवर । तेव्हा थरथर रणांगणी ॥६०॥

देवांतकाच्या ऐकोनि महाहाका । देव स्मरती विनायका । स्मरणे सोडिती नरनायका । प्राण तेव्हा रणांगणी ॥६१॥

कितीक सिद्धीचे वीरविक्रम । सांडोनिया पराक्रम । करू लागले निंद्यकर्म । पलायनरूप तेधवा ॥६२॥

त्यामाजी जे वीर होते । ते संग्राम जाहले करिते । देवांतक घेऊनि खड्‌गाते । सिद्धीज वीरांते संहारी ॥६३॥

जाहला वीरांचा फार संहार । सिद्धी धावती तेव्हा सत्वर । त्यावरी खड्‌ग घेऊनि असुर । रौद्रकेतुकुमर उठावला ॥६४॥

ऐसे पाहता गरिमासिद्धी । सद्रुम पर्वत घेऊनि हाती । टाकिती जाहली देवांतकावरती । दैत्य छेदी खड्‌गे तया ॥६५॥

तेव्हा गरिमा उडाली सबळ । खड्‍ग फिरवी तेव्हा खळ । गरिमेचे अद्भुत बळ । खड्‌ग तत्काळ हरिले तिणे ॥६६॥

ते खड्‌ग तिणे भोवंडिले । देवांतकाचे शिरी मारिले । परी खड्‌गाचे तुकडे जाहले । नाही भंगले शीर त्याचे ॥६७॥

हातीचे खड्‌ग सिद्धीने हरिता । चाप सज्जवोनि तत्वता । दैत्य बाण जाहला वर्षता । शुकताता तेधवा ॥६८॥

पांचसातनवबाणघाये । जर्जर केले सिद्धीकार्ये । त्याही त्यागोन चैतन्य सोये । विव्हळ पडल्या रणांगणी ॥६९॥

पडता मूर्च्छित सकल सिद्धी । रणात खांदळे दैत्यपती । शर वर्षोन शीघ्रगती । सकल सेना मारीतसे ॥७०॥

एकमुहूर्ते सावध जाहल्या । विनायकासि शरण गेल्या । बुद्धीने त्या अधोमुख पाहिल्या । मग आश्वासिल्या तयेने ॥७१॥

विनायकाग्र करोनि मन । त्याचे पदी करोनि नमन । बुद्धी बोले विनत होऊन । गजानन श्रवण करी ॥७२॥

बुद्धी म्हणे प्राणेश्वरा । अप्रमेया परात्परा । आता माते आज्ञा करा । शारदाकुमरा त्रासीन मी ॥७३॥

ऐकता प्रिया बुद्धीचे वचन । आनंदला सनातन । देऊन बुद्धीस आलिंगन । कुरवाळोन बोलतसे ॥७४॥

बुद्धी घेई वस्त्रभूषणे । संग्रामी जय पावशील तेणे । वस्त्रालंकार घेऊनि तिणे । केले गमन रणासी ॥७५॥

आज्ञा घेऊनि तेव्हा पतीची । बुद्धी चाले वाट रणाची । तेव्हा कापली दानवांची । शिरे मुगुटासहित पै ॥७६॥

मुखे करित सिंहनाद । ऐकता मूर्च्छित दानववृंद । पडला कितीकांचा प्राणभेद । शरीरांसि जाहला ॥७७॥

कितीक म्हणती पळापळा । कठीण पातली काळवेळा । कितीएक तयेवेळा । दैत्यपाळा रक्ष म्हणती ॥७८॥

कितीक टाकोनिया रण । दैत्य पळोन वाचविती प्राण । तव बुद्धी पातली दारुण । जाहले विंदाण तिजपासुनी ॥७९॥

बुद्धीचे मुखापासोन कृत्या एक । उत्पन्न जाहली अलोलिक । करालवदना निःशंक । पाहता कापती दानव पै ॥८०॥

कृत्या गर्जे जेव्हा रणी । दैत्येश कोपे अंतःकरणी । चाप सजऊनि तेक्षणी । विंधी बाणी तयेते ॥८१॥

कृत्येने पसरोनि विक्राळमुख । गिळिले दैत्याचे सायक । देवांतक बाण अनेक । वर्षे मेघधारांपरी ॥८२॥

सरले भात्यांतील शर । बलक्षीण जाहला तेव्हा असुर । ऐसे कृत्या पाहोन दुर्धर । सेनेमाजी प्रवेश करी ॥८३॥

तिणे केला प्रळय थोर । लक्षानुलक्ष भक्षिले असुर । कितीक पादे केले चूर । पातली सत्वर देवांतकासी ॥८४॥

देवांतकासि कृत्या बोले । जे मी दानव भक्षिले । ते अवघे पचोनि गेले । आता आले तुजपासी ॥८५॥

तूते भरिते भगांतरी । येथे राहा तू गर्भापरी । ऐकता असुर पलायन करी । कृत्या ते अवसरी धरू पाहे ॥८६॥

स्वर्गमृत्युपाताळ । तेथे पळोन जाय खळ । कृत्या पाठीस लागली प्रबळ । तिणे सबळ धरिला तो ॥८७॥

कृत्येने देवांतक धरोनी । निजभगी घालोनि ते क्षणी । बुद्धिपासी तत्काळ येऊनि । आनंदोनि भेटली तीते ॥८८॥

मग कृत्येसहित बुद्धी परतली । विनायकापासी आली । त्याते पाहता आनंदली । चित्तवृत्ती देवांची ॥८९॥

भगांतून तेव्हा असुर । तिणे भिरकाविला दूर । मुहूर्ते मूर्छा टाकोन सत्वर । देवांतक पळे तेथुनी ॥९०॥

योनिकर्दमे माखले शरीर । दुर्गंधीने त्रासला असुर । नदीमाजी स्नान सत्वर । करिता जाहला शुद्धदेहे ॥९१॥

अधोमुख लज्जापन्न । गृही जावोनि करी शयन । ऐसे ऐकता पितयान । तो आला धाऊन पुत्रापासी ॥९२॥

तयासि म्हणे रौद्रकेतू । का रे निश्चल निजलासि तू । रणी जाहली असेल मातू । सांग आता लाजू नको ॥९३॥

येरू करोनियस नमन । सकल सांगे वर्तमान । ऐकोनी पिता करी शांतवन । मग असुर उठोनि बैसे ॥९४॥

पिता सांगे पुत्रापासी । तुज उपदेशितो मंत्रासी । तेणे करी हवनाशी । होईल शिव प्रसन्न तूते ॥९५॥

घेवोनिया मंत्रोपदेश । अनुष्ठान करी दानवेश । हवन करी रक्तमांस । आणोनिया नरांचे ॥९६॥

निजागाचे मांस काढुन । तेणे करी असुर हवन । मग पुत्राचे शिर छेदुन । बलिदान करीतसे ॥९७॥

ईश्वर प्रासाद होता जाण । पुत्र उठला न लगता क्षण । मग अनुष्ठान परिपूर्ण । करोनि ब्राह्मण पूजितसे ॥९८॥

दाने देवोनि अपार । भोजने गौरवी विप्रवर । निशा लोटता समग्र । कुंडातून अश्व निघाला ॥९९॥

त्याते पाहता दैत्यपती । परम संतोष मानी चित्ती । अलंकार घालोन त्याप्रती । पूजा प्रीतीने करीतसे ॥१००॥

करोनि नमन पितरांशी । भावे वंदिले ब्राह्मणाशी । तुरंगी बैसोन वेगेशी । निघाला युद्धासि तेधवा ॥१॥

हिंसे तुरंगम जेव्हा । भूगोल कापे थरथरा तेव्हा । वीरश्री चढली बहुत दानवा । त्याही धावा घेतल्या रणी ॥२॥

रणासि पातला दानवपती । सिद्धीजवीर पुढे धावती । ठाण मांडोनिया निगुती । दैत्यपती युद्ध करी ॥३॥

लक्षानुलक्ष सोडोनि शर । करी देवसेनेचा संहार । देवसेनेत हाहाःकार । जाहल्या जर्जर सिद्धि रणी ॥४॥

सिद्धी पळोन लवलाही । विनायकापासी गेल्या पाही । ऐसे पाहता ते समयी । क्षोभला तेव्हा विनायक ॥५॥

सिंहारूढ होवोनि सत्वर । रणी पातला लंबोदर । मुखे सिंहनाद करी थोर । तेणे चराचर कापतसे ॥६॥

नरांतक पाहोनि विनायकाशी । म्हणे कारे व्यर्थ मरतोशी । तू खेळोन मुलांपाशी । मातृस्तनासि सेवन कर ॥७॥

अरे मी देवांतकवीर । तूते भक्षीन रे आता सत्वर । पळोन जवळ निजमंदिर । आता कर सुकुमारा ॥८॥

ऐकोन तयाची भारती । हासोन बोले गणपती । आता दावी वीरवृत्ती । व्यर्त किती बोलतोसि रे ॥९॥

विनायके चाप सज्जविले । शर लावोनि आकर्ण वोढिले । चार बाण मोकलिले । दैत्यांस वाटले आश्चर्य तेव्हा ॥११०॥

दोन कुंडले किरीट सतेज । तोडिता जाहला गणराज । देवांतकासि वाटली लाज । तेजःपुंज पाहता रिपू ॥११॥

दैत्य सोडिले निर्वाणबाण । त्याते छेदुनि गजकर्ण । सोडोनिया शर दारुण । हाके गगन गाजवीतसे ॥१२॥

विनायके बाण सोडिले । दैत्याचे बाहु भेदोन गेले । दोन ललाटी भेदले । उरी रोवले दोन पै ॥१३॥

तेणे दानवेश परम क्षोभला । घनवत शर वर्षू लागला । विनायकचे भाळी मारिला । बाण तेव्हा दैत्याने ॥१४॥

तेव्हा क्षोभला विनायक । अपरिमित वर्षे सायक । तेणे झाकुळला अर्क । अंधार देख पडला रणी ॥१५॥

विनायकाचे बाण तिखट । त्याही संहारिले दानवभट । त्याचा पराक्रम उद्धट । दैत्य सेना पळो लागली ॥१६॥

सांडिता स्वचमूने धीर । क्षोभोन देवांतकवीर । धनुष्यी लावोनिया शर । मंत्रोच्चार करितसे ॥१७॥

अभिमंत्रोनि बाण सोडिता । लक्षानुलक्ष गज तत्वता । उत्पन्न होवोनिया अवचिता । मर्दिते जाहले देवसेना ॥१८॥

मदोन्मत्त कुंजरथाट । त्याही मर्दिले देवभट । ऐसे अवलोकिता विकट । करी खटपट अस्त्राची ॥१९॥

लंबोदरे सिंहास्त्र प्रेरिले । त्यापासून हरी उत्पन्न जाहले । त्याही गज संहारिले । मग मारिले दानवगण ॥१२०॥

सिंह माजले अत्यद्भुत । ते राक्षसांते हारित । तेणे दैत्य करिती अत्यंत । हाहाःकार तेधवा ॥२१॥

दैत्येश करी विचार । मग शार्दूलास्त्र योजी सत्वर । तेणे शार्दूल जाहले अपार । त्याणी सिंहास संहारिले ॥२२॥

पाहता गणेशाचा पराक्रम । दैत्य क्षोभला अधम । तेणे अस्त्र योजिले उत्तम । सोडी परम क्रोधभरे ॥२३॥

एक गंधर्वास्त्र अत्यद्भुत । दुसरे निद्रास्त्र तेव्हा सोडित । तेणे जाहले विपरीत । महा अनर्थ देवगणी ॥२४॥

गंधर्व अप्सरा अतिसुंदर । गायन करिती अतिमधुर । तेणे तन्मय जाहले रण समग्र । निद्रा थोर दाटली तया ॥२५॥

रात्री जैसे घोरतर । निद्रिस्थ होती शयनी नर । तैसे रणांगणी वीर समग्र । निद्राभरे घोरती ॥२६॥

अस्ताव्यस्त जाहली वसने । स्त्रिया पहुडल्या हारीने । शयन केले विनायकाने । कौतुक दाविले दैत्यांसी ॥२७॥

सकल रणांगणी पहुडले । तेव्हा देवांतकासि फावले । तेणे त्रिकोणी कुंड केले । स्नान केले रक्ताने ॥२८॥

आणोनि मनुष्यांची प्रेते । वरी आसन घालोनि निगुते । आणोनि दैत्यांची शोणिते । तैसी पिशिते अमुप पै ॥२९॥

तेणे करी दैत्य हवन । सहस्त्राहुति होता जाण । नरमांसे परिपूर्ण । करी संपूर्ण हवनासी ॥३०॥

तव कुंडातूनी एकाएकी । देवी निघाली परम नेटकी । क्षुधातुर पाहता एकाएकी । देवांतक अर्पी बळी ॥३१॥

नरमांस रक्त तीते अर्पित । ते भक्षून जाहली तृप्त । मग कुंडाचे बाहेर येत । तीते पूजित देवांतक ॥३२॥

मग अंकी घेऊनि दैत्यासी । उडोन गेली आकाशी । आनंद जाहला असुराशी । सिंहनादासी करीतसे ॥३३॥

रौद्रकेतू वदे नरांतकाशी । व्यर्थ खटपट कारे करिशी । काय भितोस बाळकाशी । पराक्रमासि पाहे माझ्या ॥३४॥

श्रोते परिसा पुढील कथा । कपटी करोनि विनायकमाता । रणी आणील देवांतक पिता । ती कथा वदू पुढे ॥३५॥

जयजयाजी निरंजना । अनाथसाधू सनातना । धर्मदत्तज कन्यारंजना । राहो मनी ध्यास तुझा ॥३६॥

स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराण संमत । क्रीडाखंड रसभरित । चतुर्दशोध्याय गोड हा ॥३७॥

अध्याय ॥१४ ॥ ओव्या ॥१३७॥