श्री गणेश प्रताप

सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.


क्रीडाखंड अध्याय २०

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।

जयजयाजी विश्वभूषणा । देवाधिदेवा गजकर्णा ।

माझें चित्त तुझिया चरणा । लावी करुणा करोनियां ॥१॥

यास उपाय एक आहे । आशा पूर्ण करोनि पाहे ।

त्यावांचोनि मन नोहे । स्वाधीन तुझिये सर्वसाक्षी ॥२॥

पार्वती सदनीं विश्वबीज । होवोनि तिचा आत्मज ।

लीला करोनि दावी सहज । तेजःपुंज प्रतापी ॥३॥

चवथें वर्ष तयाशी । लागतां लीला जाहली कैशी ।

पार्वती उठोन एके दिवशीं । प्रातःकाळीं स्नान करी ॥४॥

पूजा साहित्य सिद्ध करुन । घालून तिणे पद्मासन ।

पार्थिव मूर्तीचें पूजन । केलें भक्तिपूर्वक पैं ॥५॥

गुणेश तल्पकीं जागृत जाहला । हाका मारी पार्वतीला ।

पूजेमाजी अद्रिबाला । सोवळयांत गुंतली ॥६॥
माता न ये दीर्घकाळ । ह्मणोन खालीं उतरोनि बाळ ।

स्फुंदत आलें मातेजवळ । म्हने प्रेमळे स्तन देयीं ॥७॥
ह्मणोन तिचा अंचळ वोढिला । उगा राहे ह्मणे त्याला ।

नगजेनें जवळ घेतला । कुरवाळिला निजकरें ॥८॥

बाळ रडे आक्रंदोनी । हात घाली तिचे स्तनी ।

हात काढोनियां भवानी । जाहली ध्यानीं सादर ॥९॥

माता न देतां स्तनपान । क्रोधें संतप्त गजानन ।

हातावरील मूर्तीं ढकलुन । देता जाहला क्रोधभरें ॥१०॥

पडतां मूर्ती धरणीतळीं । क्रोधें नगजा उतावळी ।

दक्षिण हस्तें तयेवेळीं । मारी थापटी तयाते ॥११॥

येरु गडबडां लोळे भूमीशी । रडत उठोन अंगुलीशी ।

डसता जाहला हृषीकेशी । शोणित वाहे भडभडां ॥१२॥

माता उठोनि वेगें । धरुं पाहे महारागे ।

काय केलें भवभयभंगें । उठोनियां पळाला ॥१३॥

पुढें पळे गुणेश जेव्हां । माता मागें लागे तेव्हां ।

न सांपडे भक्तविसावा । भावाविना कवणासी ॥१४॥

जवळ जंव आली पार्वती । तंव तो दिसे अष्टमूर्ती ।

त्रिशूलादि आयुधें हातीं । सर्वांगीं विभुती चर्चिली ॥१५॥

शंकर देखतां निजपती । खालें पाहे पार्वती ।

तो दिसे पुन्हां गणपती । नगजा सती धरुं पाहे ॥१६॥

हाती घेऊनियां वेताटी । गजगामिनी लागे पाठी ।

धांवतां जाहली हिंपुटी । परी गांठी पडेना ॥१७॥

माथ्यावरील ढाळोन पदर । कुरळ कच उधळले सुंदर ।

घर्मबिंदू येऊनि थरथर । कांपे थोर क्रोधभरें ॥१८॥

श्वास भरोनि धांवे घाबरी । हें पाहून भक्तकैवारी ।

मनामाजी विचार करी । म्हणे गौरी भागली ॥१९॥

तप सायास हिणें केले । माते पुत्रत्व मागीतलें ।

तें फळ पाहिजे पूर्ण केलें । हळू चाले दमोनियां ॥२०॥

अद्रिजेनें धावोनि धारला करीं । वेताटीं तेव्हां त्यास उगारी ।

विनायक कर वरी करीं । भिवोन करी दीन मुखें ॥२१॥

वेताटी उगारोन दाबी त्यास । परी न मारवे प्रिय पुत्रास ।

अंचलें बांधोन तयास । आणिला घरास नगजेनें ॥२२॥

तेथें घोवोनियां लोळण । स्फुंद स्फुंदोन रडे गजकर्ण ।

शिथिल होतां अंचल बंधन । निघोन आंतून पळाला ॥२३॥

माता म्हणे रे राजसा । पुन्हां पळाला येथून कैसा ।

शिवास सांगतां विचार कैसा । होईल मागें फिरे कां ॥२४॥

महाक्रोधी आहेत पती । ते ताडितील तुजप्रती ।

माघारा फिरे गणपती । पुढली गती धरुं नको ॥२५॥

तिचें न ऐकतां गजानन । पुढें करी पलायन ।

तंव कर्दमासुर पुढें येऊन । विप्र होऊन उभा राहे ॥२६॥

तयासि म्हणे कपटी विप्र । कांरे इतका पळतोस क्षिप्र ।

बाळकांसि भरलें कांप्र । म्हणे दडवी मजसी तूं ॥२७॥

तव तो उचलोन एकदंत । मुखामाजी घालोनि गिळित ।

तंव माता आली धांवत । ती पुसत ब्राह्मणासी ॥२८॥

माझा देखिला काय नंदन । येरु हातें झांकी नयन ।

तीस म्हणें मजलागुन । काय म्हणोन पुसतेसी ॥२९॥

तूं काय माझे हवालीं केला । म्हणोन ठाव सांगूं तुजला ।

तंव बाळ मुखांतूनि निघाला । तो देखिला आर्येनें ॥३०॥
तेव्हां विप्रास म्हणे गोरटी । तुम्ही दिसतां बहुत कपटी ।

माझा कुमर कशासाठीं । तुम्हीं भटीं लपविला ॥३१॥
असुरें आपलें रुप धरिलें। पाहतां तिणें नेत्र झांकिले ।

बाळकें तयास उचलिलें । भिरकाविलें दूर देशीं ॥३२॥

पुन्हां आला सरसाउनि । मग हापटी मोक्षदानी ।

असुर पडला तेथें मरुनी । सावध भवानी जाहली ॥३३॥

धांवोनियां लवलाहीं । उचलोनि धरिला तिणें हृदयीं ।

गृहीं नेवोनियां तेसमयीं । स्तनपान करवीतसे ॥३४॥

जावळ सरसाऊनि ते समयीं । बाळकाचें मुख पाहीं ।

तेणें देतां जांभयी । मुखांत पाहे जगदंबा ॥३५॥

तंव देखिली विश्वस्थिती । अनंत विश्वें मुखीं नांदती ।

पाहतां विस्मित जाहली पार्वती । मूर्च्छा दाटली तयेतें ॥३६॥

मुहूर्तें सावध होवोनि पाहे । तंव पुढें बाळ खेळताहे ।

मनामाजी विचारुं पाहे । म्हणे नोहे बाळक हा ॥३७॥

तिणें त्याची स्तुती केली । बाळ माया तिजवर घाली ।

पुर्वावस्था विरोन गेली । देऊ लागली स्तनपान ॥३८॥

एके दिवसीं प्रातःकाळीं । मिळोनियां अर्भक मंडळी ।

येऊनियां पार्वती जवळी । म्हणती गुणेश कोठें वो ॥३९॥

मुलें मारिती तयास हांका । उठे उठे रे विनायका ।

प्रातःकाळ जाहला निका । आजोनि सख्या निजलाशि कां ॥४०॥

अंबा म्हणे बाळकातें । कांरे उठवितां तान्हयातें ।

ते म्हणती मातेतें । न गमे आम्हांसि तयाविना ॥४१॥

रात्रदिवस सख्यावांचुन । आम्हास नसे दुजे ध्यान ।

ऐसें त्याचें वचन ऐकुन । जागृत तिणें केला सुत ॥४२॥

जागृत होवोनि गजानन । मातेचें करी स्तनपान ।

तंव पुढें मुलें येऊन । हातीं धरोनि म्हणती तया ॥४३॥

चल जाऊं खेळावया । घरांत बसशी कां सखया ।

गुणेश तेव्हां उठोनियां । बाहेर निघाला तेधवां ॥४४॥

हात धरोनि परस्पर । गांवाबाहेर लंबोदर ।

लेकुरांसहित येऊनि सत्वर । खेळ विचित्र मांडिला ॥४५॥

देवोनि वस्त्रालंकाराशी । सिंधु धाडी खड्‌गासुराशी ।

तो धरी उष्ट्ररुपाशी । मान आकाशीं भेदली ॥४६॥

मुखीं लडबडे जिव्हा ज्याची । विक्राळ गर्जना ऐकोन त्याची ।

लेंकुरें घाबरलीं ऋषींचीं । पळती जाहली दशदिशा ॥४७॥

म्हणती धांव रे भक्तवत्सला । विक्राळ दानव पाहा आला ।

ऐकोनियां गुणेश धांवला । महद्रूपाला प्रगट करी ॥४८॥

पादघातें असुर धरणी । कांपवीतसे क्षणोक्षणी ।

हें पाहतां चिंतामणी । काय करणी करीतसे ॥४९॥

त्याचे मस्तकीं मारोन घाय । केला त्याचा शतचूर्ण काय ।

खुंटला दैत्याचा उपाय । प्राणासि अपाय जाहला ॥५०॥

शरीर चुरोनि वाहे शोणित । विजयी जाहला शिवसुत ।

बालकें घालिती दंडवत । मुख पाहती प्रेमभरें ॥५१॥

तंव त्याचा सखा दैत्यविक्राळ । काळें केला उतावीळ ।

पादघातें अवनीतळ । कांपवी खळ तेधवां ॥५२॥

आकाशी टाळू भेदित गेली । तेणें पाहून गुणेश सांवली ।

त्यांत शिरोनि मान केली । मूर्ती पाडली गुणेशाची ॥५३॥

पुन्हा उठोनि भक्तपती । चालतां जाहली तीच गती ।

पाहून त्यासि बालक ह्मणती । किती गणपती पडतोसी ॥५४॥

विचारोनि पाहे देवाधिदेव । कळली तेव्हां दानवाची माव ।

मग प्रगट करी निजवैभव । सदाशिव तनुज पैं ॥५५॥

घेऊनियां पाषाण करीं । निजच्छायाहृदयीं मारी ।

सावलीवरी नृत्य करी । देह चुरी तयाचा ॥५६॥
दैत्य स्वरुप करोनि प्रगट । प्राण सोडी तेव्हां भट ।

ज्याचें सामर्थ्य फार तिखट । देव कांपती पाहूनि तया ॥५७॥

त्याचा सहज घेऊनि प्राण । विजयी जाहला गजकर्ण ।

पुष्पें वर्षती सुरगण। अत्यादरें करुनियां ॥५८॥
पुन्हां चिमण्या बाळांसहित । डाव मांडोनियां अनंत ।

नाना रितीं खेळ खेळत । एकदंत प्रतापी ॥५९॥
तंव धांवला चंचलासुर । बाळ होऊनि चिमणे सुंदर ।

कंदुक घेऊनियां सत्वर । डाव असुर मांडीतसे ॥६०॥

ज्याचे हातींचा कंदुक । जो झेलील बळें बाळक ।

कंदुक उडवी त्याचे स्कंदी देख । बैसोन फिरणे क्षणभरी ॥६१॥

ज्या ज्या बाळकानीं उडविले कंदुक । ते ते झेली दानव देख ।

स्कंधी तयास घेतां बाळक । त्याच्या भारें आक्रंदती ॥६२॥

अंबात्मजें चेंडू उडविला । तो अंबरीं असुरें झेलिला ।

येऊनि त्याचे स्कंधी बैसला । भार घातला बहुत तेणें ॥६३॥

दैत्य म्हणे विनायकाशी । मुलांमाजी बळकट होशी ।

आतां कारे कांपतोशी । धरीं धीरासी चालबळें ॥६४॥

तयासि खाली उतरोन । त्याचा कंदुक विनायकान ।

झेलित दैत्य स्कंधीं घेऊन । चालला तो व्योमपंथें ॥६५॥

वरी करोनियां मुखें । बाळ पाहती तेव्हां दुःखें ।

हाका मारिती सखे सखे । येई हरिखें माघारा ॥६६॥

गगनपंथें जाय असुर । मनी तरकला जगदीश्वर ।
हृदयीं हाणोनि लत्ताप्रहार । घाली भार तयावरी ॥६७॥

जाणोनि त्याचा प्रभाव । तयासि विनवी दानव ।

माझा नको घेऊ जीव । तूं जाणता सर्व जगत्रयी ॥६८॥

मी शरण आलों तुजला । देवा नको मारुं मजला ।

ऐकतां गुणेशें तयाला । भिरकाविला दूरदेशीं ॥६९॥
बाळकांमाजी पुन्हां आला । मुलें झोंबती तरच्चरणाला ।

ह्मणती त्यागूं नका आह्माला । जात होतासि दूर देशीं ॥७०॥

आह्मी पूर्वजन्मीं तप केले । ते आमचें फळासि आलें ।

म्हणोनि देवा तुझीं पावलें । सदां देखूं प्रेमभरें ॥७१॥
तुझ्या वियोगें आमचे प्राण । तळमळती रे गजकर्ण ।

तुझ्या संगे भूकतान्ह । न लागे बा सर्वथा ॥७२॥

दीडप्रहर चढला दिवस । मुलें न येती घरास ।

क्रोध येऊनि त्यांचे पित्यांस । घेऊनि छडीस निघाले ॥७३॥
गांवांबाहेर बालकांसहित । खेळ खेळे एकदंत ।

तेथें पातले धांवत । नेत्र वटारिती पोरांवरी ॥७४॥

येतां देखिले वडिलजन । मुलें कांपती थरथरोन ।

त्याही विलोकितां गुणेशवदन । क्रोधमन जाहला त्यांचा ॥७५॥

वृद्ध म्हणती नगजात्मजा । तुवा नासले आमचे आत्मजा ।

गृहीं न राहती गणराजा । लेकुरें तुजवीण सर्वथा ॥७६॥

करीत नाहींत विद्याभ्यास । जाणत नाहीत स्वकर्मास ।

सदा तुझें वेड त्यांस । होवोनियां वेडावली ॥७७॥

आतां सोडोनि तुझा शेजार । केलें पाहिजे ग्रामांतर ।

ऐसें ऐकतां अंबाकुमर । जाऊनि दूर बैसला ॥७८॥

त्याचेमागें सकल बाळ । करीत गेले गदारोळ ।

त्याचें वंदोनि पादकमळ । जाहले प्रेमळ सद्गद ॥७९॥

तेथून मुलें दूर जातां । माघारें वृद्ध आले तत्वता ।

लेंकुरें म्हणती बा अनंता । क्षुधा आतां लागली ॥८०॥

मग घेऊनी बाळकजन । ग्रामीं प्रवेशला गजानन ।

गौतमाश्रमी तेव्हां जाऊन । केले विंदान तयाने ॥८१॥

ध्यानीं निमग्न गौतममुनी । गुणेश निघाला तेथुनी ।

पाकशाळेमाजी शीघ्र येउनी । विधी नंदिनी अवलोकित ॥८२॥

स्नान करुनि सोवळेपणें । अहिल्या पाक करी सुलक्षणे ।

मुलांसि गजकर्ण म्हणे । अतां जेवणे येथेंच पैं ॥८३॥

मुलांसहित पात्रें घेउनी । ओदनादि अन्न पात्रीं वाढूनी ।

भोजन करी कैवल्यदानी । आनंदोनि तेधवां ॥८४॥

लेंकुरा सांगे गजानन । स्वस्थ करा हो तुम्ही भोजन ।

अहिल्या होवोनि क्रोधायमान । वटारोनि नयन बोलतसे ॥८५॥

काय तुवां हें बंड केलें । सोवळें अन्न विटाळलें ।

न पुसतां तुवां वाढिलें । सारीं मुलें जेवताती ॥८६॥

न करितां वैश्वदेव देवतार्पण । बळें जेविसी गजकर्ण ।

अंबा तूतें करील ताडण । सांगतां गार्‍हाणें बाळका ॥८७॥

ध्यान विसर्जोनि ऋषिगौतम । पाहोनि त्याचें अनुचितकर्म ।

कोपें खवळला विप्रोत्तम । सक्रोध बोले तयातें ॥८८॥

उत्तम कुळांत जन्मलासी । त्याचें नांव कैसें बुडविसी ।

पाक विटाळून बळें खाशी । न जाणसी शास्त्रविधी ॥८९॥

भोजनपात्रासहित । तयास तेथून हाती धरित ।

नेवोनि अंबेसि दावित । पहा म्हणत कर्म याचें ॥९०॥

प्रतिदिनीं खोडया करी । न कथिलें तूतें आजवरी ।

आह्मी न राहावें तुमचे शेजारीं । ग्रामांतरीं जातसें ॥९१॥

ऐकोन ऋषीची सक्रोधवाणी । भयें कांपे तेव्हां मृडानी ।

मस्तक ठेऊनि ऋषिचरणीं । विनयपणी बोलतसे ॥९२॥

अंबा म्हणे वो दयाळुवा । अपराध येव्हडा उदरीं ठेवा ।

येणें बुडविलें आमुचे नांवा । आतां पहावा दंड याचा ॥९३॥

दोरी घेऊनियां माय। बळकट बांधी त्याचे पाय ।

स्फुंदस्फुंदोनि गणराय । महाकाय रडतसे ॥९४॥

तळघरीं नेऊनि ठेविला । सर्वेश्वर म्हणे मातेला ।

न करी पुन्हां अन्यायाला । सोडी मजला जननीये ॥९५॥

न ऐकतां त्याचें वचन । अंबा ठेवी त्यास कोंडून ।

गौतम स्वाश्रमीं जाऊन । करी स्नान तेधवां ॥९६॥

स्नान करुनि अहिल्यासती । पुन्हां पाक जाहली करिती ।

नैवेद्य ताट घेवोनि हातीं । देवांप्रति घेऊनि गेली ॥९७॥

करावया नैवेद्यार्पण । देवघरांत गेला ब्राह्मण ।

गुणेश रुपें देवगण । दिसते जाहले तयासी ॥९८॥

देवापुढें उच्छिष्ट पात्र । पाहोनियां ऋषिपवित्र ।

म्हणे काय हें आहे विचित्र । शिवपुत्र दिसे तयां ॥९९॥

ब्राह्मण पाहे जिकडे तिकडे । दिसे गुणेशाचे रुपडें ।

पाहतां ब्राह्मण जाहले वेडे । कर्मकुडें म्हणे माझें ॥१००॥

परमात्मा सनातन । तोचि जाहला गौरीनंदन ।

तो मी आतां न जाणून । करवी बंधन तयासी ॥१॥

अहा ईश्वरा तुझी माया । ब्रह्मादिकां नये आया ।

तेथें मानवी माझी काया । करी दया सर्वज्ञपणें ॥२॥

तळघरीं कोंडिली गुणेशमूर्ती । मुलें स्फुंदस्फुंदोन रडती ।

कां उपेक्षिलें आम्हाप्रती । तुवां गणपती आज कैसे ॥३॥

न गमे सखया तुजवांचुन । उदास जाहलें आमचें मन ।

आतां देऊनियां दर्शन । करी शांतवन आमचें ॥४॥

त्याचा पाहोनि भक्तिभाव । त्यास भेटला देवाधिदेव ।

मुलें करुनि गद्गदरव । भेटती प्रेमें तयासी ॥५॥

मातेस सांगती गजगामिनी । तूं कैसा ठेविला त्यास कोंडुनी ।

गुणेश गेला बाळकें घेउनी । आतां उपवनीं खेळावया ॥६॥
तंव दुसरी येऊनि गुणेशमूर्ती । तेणें जानूस कवळोनियां पार्वती ।

स्तनपान मागे तयेप्रती । तिसरा मागे दध्योधन ॥७॥

चवथा तिचा धरोनि हात । कडियेवरी घे म्हणत ।

नगजा पाहे विस्मित । अनंतरुपें तयाचीं ॥८॥

उघडोनि खोलीचें द्वार । तेथें पाहिला निजकुमर ।

त्याचे चरण सोडोनि सत्वर । तयासि आलिंगीं प्रेमे ॥९॥

प्रेमभरें फुटला स्तनीं पान्हा । तिनें पाजिला तो तान्हा ।

सद्गद रुचिरानना । पाहे वदन कुमराचें ॥११०॥

स्वस्तिश्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराण संमत ।क्रीडाखंड रसभरित ।

विंशतितमोध्याय गोड हा ॥१११॥अध्याय ॥२०॥ओव्या॥१११॥श्रीगजाननार्पणमस्तु॥

अध्याय विसावा समाप्त