श्री गणेश प्रताप

सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.


क्रीडाखंड अध्याय २१

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।

ॐ नमोजी परात्परा । पूर्णानंदा लंबोदरा ।

अघहारका रे सुंदरा । करुणाकरा भक्तपते ॥१॥

जन्मोनियां मानव । तूतें न स्मरती देवाधिदेव ।

त्यांचें काय वर्णावें वैभव । बुडविलें नांव तयानीं ॥२॥

ज्यास नाहीं त्वत्पादभक्ती । काय वर्णावी त्याची शक्ती ।

सर्वात्मा तूं गणपती । त्याची प्रीती तुज नाहीं ॥३॥

जे त्वत्पदाब्जी जाहले भ्रमर । त्यांस वंदिती सर्वामर ।

त्याचे दर्शनें पामर । उद्धरती अविलंबें ॥४॥

माझे मनीची हीच आवड । मुखें गावें त्वन्नाम गोड ।

न व्हावी विषयाची चाड । हेंचि सुघड मागतों तुजसीं ॥५॥

गताध्यायीं जगन्निवास । आनंदरुपें मातेस ।

दावितां पावली विस्मयास । जगन्माता तेधवां ॥६॥

तंव विश्वकर्मा अंबासदनीं । येतां अवलोकी भवानीं ।

आदरें बैसवोनि आसनी । पूजाविधानी सादर ॥७॥

विश्वकर्मा वंदोनि भवानी । सादर जाहला तिचे स्तवनी ।

जयजय वो विश्वजननी । ध्यानीमनी ध्यास तुझा ॥८॥

अप्रमेया तूं आदिशक्ती । केल्या तुंवा नानाव्यक्ती ।

त्रिगुणात्मिका गुणकीर्ती । तूंच पार्वती नटलीस वो ॥९॥

वेदांस न कळे तुझा महिमा । सावित्री संज्ञा तूंचि रमा ।

स्वाहास्वधा तूंचि उमा । शची परमा तूंचि पै ॥१०॥

तूं चित्रिगुणी ज्ञानकला । तूंच करोनियां विश्वाला ।

पाळोनि अंती विलयाला । पावविसी अंबे तूं ॥११॥

ऐशी नानापरी निजस्तुती । ऐकोन संतोषली पार्वती ।

त्यातें अर्पोन वरदोक्ती । जाहली पुसती तयातें ॥१२॥

कोणीकडोनि आगमन । आहे कोणीकडे जाण ।

विश्‍वकर्मा हास्यवदन । बोले वचन तयेसी ॥१३॥

तवात्मजाचा महिमा अद्भुत । ऐकोन जाहलो मनीं विस्मित ।

तो पाहावया तुझा सुत । आलो धांवत जननीये ॥१४॥

उमेनें पाचोरोनि आणिला । तो विश्वकर्म्यानें अवलोकिला ।

नक्षत्रांमध्यें चंद्र क्षोभला । बाळामाजीं तैसा दिसे ॥१५॥

तेणें बाळकासि खेळतां खेळ । धुळीनें माखलें मुखकमळ ।

विश्‍वकर्मा होऊनि उतावीळ । पादकमळ धरी त्याचें ॥१६॥

मग जोडोनि करसंपुट । स्तवनीं सादर जाहला सुभट ।

स्तव ऐकोनियां संतुष्ट । वक्रतुंड जाहला ॥१७॥

विश्वकर्म्यास म्हणे जगज्जीवन । काय आणिलें आम्हा लागुन ।

ऐसे त्याचें वचन ऐकुन । करुनि नमन बोलतसे ॥१८॥

तूं विश्वंभर आदिमूर्ती । मी काय द्यावें तुजप्रती ।

तथापि आयुधें करोनि निगुती । आणिलीं गणपती तुजलागीं ॥१९॥

पाशपद्मपरशांकुश । पुढें ठेवितां परेश ।

संतोषोनियां गुणेश । पुसे तयासि तेधवां ॥२०॥

आयुधें आणिलीं तुवां कोठुनी । विश्वकर्मा सांगे मधुरवचनीं ।

संज्ञानामें माझी नंदिनी । होय मानिनी सवित्याचीं ॥२१॥

रमाशचीरती ललना । लज्जित पाहतां तिचे वदना ।

रवीनें वरोनि ती अंगना । नेली सदना अत्यादरें ॥२२॥

दिनेशाचें तेज अद्भुत । न सांहूनि संज्ञा पळत ।

आली माझे मंदिरांत । मागें येत दिनकर ॥२३॥

मातें क्रोधें बोले सविता । कां रे ठेविसी गृहीं दुहिता ।

ऐसें त्याचें वचन ऐकता । घरांतूनि सुता घालविली ॥२४॥

रवीने हातीं धरोनि तिजसी । पुन्हां नेली निज मंदिराशी ।

परी रवितेज न सोसे तिजसी । चुकवोनि त्यासि पळाली ॥२५॥

वनीं होवोनियां अश्विनी । राहती जहाली निशिदिनीं ।

रवी माझे गृहीं येउनी । पुसे मानिनी दाव कोठें ॥२६॥

मी ऐकोन त्याचें वचन । सांगीतलें सूर्यालागुन ।

तुझें तेज तीतें सहन । होत नाहीं दिनमणी ॥२७॥

आतां पळोन कोठें गेली । तिची वार्ता नाहीं कळली ।

जरी तुवां पुन्हां आणिली । तरीं पळेल मागुतेनी ॥२८॥

तुवां आपुलें तेज करोनि कमी । मग न्यावी शोधोनि स्वाश्रमीं ।

मातें बोले दिवसस्वामी । तेज तुम्ही न्यून करा ॥२९॥

मग मी यंत्रीं सूर्य स्थापिला । कांतोनियां नीट केला ।

न्यून तेज सविता जाहला । मग निघाला तेथून ॥३०॥

तीतें शोधी वनोपवनीं । तंव ती जाहली दिसे अश्विनी ।

मग आपण तुरंग होउनी । रमता जाहला तयेशी ॥३१॥

तिचे उदरीं अश्विनीसुत । जाहले तेव्हां जगविख्यात ।

रुपें उणा अनिरुद्ध तात । बाळ अद्भुत सतेज तें ॥३२॥

न्यूनतेज पाहूनि सविता । संतोषली माझी दुहिता ।

पत्याश्रमीं आनंद भरिता । जाती जाहली त्याचे सवें ॥३३॥

संतोषूनियां तमारी । तिशीं सर्वदा क्रीडा करी ।

हें ऐकतां मी अंतरीं । तोष पावलों बहुसाल ॥३४॥
जेव्हां रवीसि म्यां कांतिलें । तेव्हां निघाली त्याचीं शकलें ।

मग मी त्याचें सार्थक केलें । कष्टें निर्मिलें आयुधांसी ॥३५॥

चार दिधलीं हीं तुजला । चक्र गदा अर्पिली हरिला ।

त्रिशूल शंकरासि दीधला । संतोषला परमात्मा ॥३६॥

सूर्य आयुधें विजयकर । धारण करोत तुझे कर ।

ऐकोन तोषला लंबोदर । जगदीश्वर परमात्मा ॥३७॥

आयुधें घेऊनियां करीं । जेव्हां गुणेश गमन करी ।

तेव्हां उर्वी कंप धरी । अरण्यगिरिसमवेत ॥३८॥

आज्ञा घेऊनि विश्वकर्मा । प्रवेश करितां स्वधामा ।

पुढें कथा विप्रोत्तमा । काय जाहली ती श्रवण करी ॥३९॥

बाळकांचा मेळा घेउनी । खेळ खेळे मोक्षदानी ।

तंव वृकासुर तेथें येउनी । पदें अवनी कांपतसे ॥४०॥

सरसावोनियां लवलाहीं । धरुं पाहे ते समयीं ।

सृणीघातें गुणेश पाहीं । मृत्युपंथें धाडी तया ॥४१॥

राक्षसाचें विशाळ प्रेत । पडतें जाहलें अरण्यांत ।

चूर्ण जाहले तरु बहुत । पाहतां विस्मित लेंकुरे पैं ॥४२॥

एके दिवसीं भवानी । बैसली असतां आनंदोनी ।

प्रसन्न चित्त शिवालागुनी । बोले नमुनी मधुरोक्तीनें ॥४३॥

पार्वती म्हणे हो देवाधिदेवा । आतां पुत्राचा व्रतबंध करावा ।

संसारामाजी सुख ठेवा । सदाशिवा अन्य नाहीं ॥४४॥

गृहीं करावी मंगलकार्यें । पुत्रदारादि स्ववीर्ये ।

पालोनि गृहीं आर्ये । सुख भोगवावें स्वामीनें ॥४५॥

ऐसें ऐकतां प्रियवचन । शिव म्हणे प्रमोदून ।

आतां व्रतबंध करीन । प्रियनंदनाचा चंद्रानने ॥४६॥

कश्यपादि ऋषीचे संमतें । काढोनि उत्तम मुहूर्तातें ।

शिवें सामुग्रीचे आईतें । सिद्ध केलें तेधवां ॥४७॥

उभविले विस्तीर्ण मंडप । कार्यास राबती तेथें स्वर्गप ।

मंगलारंभीं गणाधिप । करुन साक्षेप अर्चियेला ॥४८॥

आमंत्रणें पाचारलें सुरमुनी । तैशाच आणिल्या सुरकामिनीं ।

आनंदें पातल्या सुरेश्वरसदनीं । रंभातिलोत्तमादि अप्सरा ॥४९॥

बटूस घालोनि रत्‍नभूषणें । मंगल विस्तारलें मंगलपणें ।

तेथें किंचित नसे उणें । काय वर्णनें वैभवासी ॥५०॥

लक्ष्मीसहित लक्ष्मीपती । जेथें येऊनियां राबती ।

त्रिदशासहित नाकपती । आज्ञा पाळिती शिवाची ॥५१॥

मंगलतुरें वाजती मंगलस्वरें । दिशा कोंदल्या दुंदुभीगजरें ।

ऋषि मिळाले एकसरें । मंत्रस्वरें गर्जती ते ॥५२॥

नृत्य करिती अप्सरागण । गंधर्व सुस्वर गाती जाण ।

मातृभोजनाचा समारंभ पूर्ण । करिती जाहली अद्रितनया ॥५३॥

अहिल्या अनुसुया अरुंधती । इंदिराशचीसावित्रीसरस्वती ।

यामुख्यत्वें अनेक युवती । एकपंक्तीं बैसल्या ॥५४॥

रत्‍नजडित कनकताटें । विस्तारलीं अनेक सुभटें ।

ऐसें मातृभोजन कोठें । पाहिलें नाहीं विप्रोत्तमा ॥५५॥

मुख्य धनधीश कुबेर । त्याचा सखा पूर्णशंकर ।

धनाधिप जोडोनि कर । धन अपार वेंचीतसे ॥५६॥

षड्रसअन्नें नानापरी । ताटीं वाढवोनियां गौरी ।

आदरें बैसऊनि सकळनारी । आपण बैसली मुख्यासनीं ॥५७॥

अंकीं बटू घेऊनि सुलक्षण । उल्हासें करी मातृभोजन ।

तो म्या उत्साह पाहून । आनंदमग्न जाहलों ॥५८॥

धन्यधन्य गौरीची पदवी । परब्रह्म जीचें पुढें जेवी ।

बालभाव कौतुक दावी । सदा रिजवी प्रेमळांसी ॥५९॥

मातृभोजन समाप्त जाहलें । पुढें चौलकर्म संपादिलें ।

बटूसि बोहोल्यावर नेलें । अंकीं घेतलें शिवानें ॥६०॥

कृतांत आणि कालसंज्ञक । दोन बलाढय आसुर देख ।

मातंगरुपें एकाएक । येते जाहले अतिदुष्ट ॥६१॥

मंडप भरला घनदाट । मंत्रघोषें गर्जती सुभट ।

नृत्य करिती अप्सरा सुभट । आनंद चोखट विस्तारला ॥६२॥

सुंदर ऋषींच्या मानिनी । उभ्या राहिल्या अक्षता घेउनी ।

लागली मंगलवाद्य ध्वनी । सुधापानी आनंदले ॥६३॥

तंव ते असुर गज उन्मत्त । होवोनियां आले धांवत ।

दानोदकें अवनी भिजत । गर्जना होत मेघापरी ॥६४॥

त्यांचा ऐकोनि विक्राळ रव । भयाभीत जाहले सुर सर्व ।

स्त्रियांनी मंदिरांत घेतली धांव । ग्रावतनये समवेत पैं ॥६५॥

पळोनि गेले तेव्हां ब्राह्मण । दशदिशां पळती देवगण ।

चौताळले उन्मत्त वारण । वृक्षपाषाण चुर्ण करिती ॥६६॥

देव पातले कार्याप्रती । त्यांची वहने बाहेर होती ।

तेथें येऊनि शीघ्रगती । पाहिला हत्ती इंद्राचा ॥६७॥

भांडत दोघे करी उन्मत्त । ऐरावतास लावोनि दांत ।

भूमीवरी पाडितां त्वरित । जाहला मूर्च्छित शक्रगज ॥६८॥

एक मुहुर्तें सावध जाहला । तेथून उठोन पळाला ।

हलकल्लोळ तेव्हां वाढला । शब्द गाजला पळापळा ॥६९॥

मंडपी एकली गुणेशमूर्ती । त्यावर लोटले उन्मत्त हत्ती ।

अनंतें कर धरोनि हातीं । महीवरती आपटिले ॥७०॥

पुन्हा सरसावले कपटी गज । त्यांतें धरोनियां गणराज ।

अंबरी फिरवोनियां सहज । आपटोनि केले शतचूर्ण ॥७१॥

गतप्राण पडले ते दानव । मग मिळाले सकळदेव ।

त्याचे शरीरीं मारोनि घाव । तुकडे करोनि दूर टांकिती ॥७२॥

जय जयकारें गर्जती अमर । पुन्हां पातले ऋषीश्वर ।

वाद्यें वाजती सुस्वर । मंत्रोच्चार विस्तारिले ॥७३॥

सभा दाटली घनदाटू । शंकरें उपदेशिला बटू ।

नाचती अप्सरागण नटू । गंधर्व सुभटू गाताती ॥७४॥

भिक्षापात्र घेऊनि करीं । भिक्षा मागतां भक्त कैवारी ।

अमित भिक्षावळ घाली गौरी । सकळनारी समवेत ॥७५॥

त्रिशूल आणि तारापती । अर्पिता जाहला गौरीपती ।

शोचिष्केशनाम निगुती । अंधकाराती स्थापी तया ॥७६॥

शक्र अर्पोनि चिंतामणी । नाम ठेवी चिंतामणी ।

भूषणें अर्पोनियां अमरगणीं । अनंत नामें ठेविली तया ॥७७॥

देवब्राह्मणाच्या ललना । भिक्षा घालिती करिती पूजना ।

पाहतां त्याचे सुंदरवदना । आल्हाद नयना अवलोकनी ॥७८॥

रत्‍नमाला रत्‍नभूषणें । मस्तकीं फाकती मुगुटकीर्णे ।

बटू शोभला अत्यंत तेणें । जन पाहणे येकवटलें ॥७९॥

दशबाहू सिंहावरी । आरुढला भक्तकैवारी ।

आयुधें शोभती दिव्यकरीं । भाळावरी शशिरेखा ॥८०॥

कमनीय शोभे सुस्मितानन । पाहाता रोमांचित जाहले जन ।

चामरें ढाळिती अमरगण । भक्तजन नांचती पुढें ॥८१॥

परमात्मा आनंदकंद । विश्वात्मा सच्चिदानंद ।

पाहोनियां सुरनरवृंद । पावले प्रमोद तेधवां ॥८२॥

येवोनि पाहे कश्यपवनिता । तंव विनायक भासे तत्वता ।

ती ह्मणे गा माझे सुता । वियोगता केली तुवां ॥८३॥

तुझे वियोगें कृश जाहलें । बहुतां दिवसीं तुज पाहिलें ।

सुहास्य वदनें गुणेश बोले । ह्मणे कळलें नाहीं तुज ॥८४॥

मीच वसतो सर्वाभूतीं । वियोग नाहीं कवणाप्रती ।

पार्वतीस बोले अदिती । माझा गणपती देई मज ॥८५॥

नगजा म्हणे माझा सुत । तूं कोण पातलीस गे अवचित ।

अंकीं घेऊनियां अनंत । अदिती माता बैसली ॥८६॥

दोघी भांडती करिती रळी । कौतुक पाहे देवमंडळी ।

दोघी सुरांस तयेवेळीं । म्हणती कळी मोडा तुह्मी ॥८७॥

माझे बळकाउनी पुत्रातें । कांहो हे अदिती भांडते ।

देव पाहती तयातें । दाविलें अनंत कौतुक ॥८८॥

क्षणांत भासे नारायण । क्षणांत दिसे भोगिभूषण ।

क्षणांत दिसे कमलासन । क्षणांत ब्रध्न भासतसे ॥८९॥

नाहीं स्त्रीपुन्नपुंसक । क्षणांत दावी रुपें अनेक ।

चकित जाहल वृंदारक । अलोलिकलीला त्याची ॥९०॥

लक्षोनि अदिती पार्वतीशी । देव सांगती ज्ञान तयाशी ।

पुत्रत्व कैसें स्थापितां याशी । येथें शब्दासि ठाव नसे ॥९१॥

निर्गुणनिरामयनिराकार । तुम्हास दिसतो तो कुमर ।

हेंच वाटतें आश्चर्य थोर । करा विचार भांडू नका ॥९२॥

लीलाविग्रही जगन्निवाअ । कौतुक दावी प्रेमळांस ।

पुत्रत्व लावितां गे कैसें त्यास । काय तुम्हास म्हणावें ॥९३॥

तंव तो जाहला षड्‌भुज । पार्वती म्हणे माझा तनुज ।

आडवा घेऊनि गणराज । स्तनपान करवीतसे ॥९४॥

अदिती होवोन खिन्न मनाशी । म्हणे काय करावें परपुत्राशी ।

वेगें करुनियां गृहाशी । जाती जाहली संतप्त ॥९५॥
शिवें परमादरें करुनी । अमूल्य वस्त्र भरणें देउनी ।

गौरविले अमरमुनी । गुणेशस्तवनीं उदीत ते ॥९६॥
अमूल्यवस्त्रालंकार । सौभाग्यद्रव्याचे भार ।

पुरविता तेथें उभा कुबेर । पार्वती अपार वांटीतसे ॥९७॥

सुरांगना नागकन्या । अरुंधत्यादि सर्व मान्या ।

आर्येनें पुजिल्या ऋषिपत्‍न्या । अत्यादरें करुनियां ॥९८॥

त्याहीं करोन गणेशाची स्तुती । पतीसह गेल्या निजमंदिराप्रती ।

प्रपंचीं वाढवोनि प्रीती । सेवी पार्वती शिवपदा ॥९९॥

स्वस्तिश्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराण संमत । क्रीडाखंड रसभरित ।

एकविंशत्योध्याय गोड हा ।श्रीगणेशार्पणमस्तु॥१००॥अध्याय॥२१॥ओव्या॥१००॥

अध्याय एकविसावा समाप्त