श्री गणेश प्रताप

सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.


क्रीडाखंड अध्याय ३३

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।

जयजयाजी विश्वभूषणा । अप्रमेया विश्वकारणा ।

करुणाकरा गजकर्णा । तुझे चरणा शरण मी ॥१॥

तुझे कृपेचे निजबळें । या ग्रंथतरुसीं आलीं फळें ।

रसयुक्त परिपक्व मेळें । ब्रह्मानंदी झेंपावती ॥२॥

श्रोते परिसा पूर्वानुसंधान । व्यासास जाहलें गणेशदर्शन ।

मग ब्रह्मानंद पाऊन । तेणें गजानन स्थापिला ॥३॥

ऐसी कथा भृगुमुनी । प्रेमें सांगे भूपालागुनी ।

राजा आनंदला मनीं । म्हणे जनीं धन्य जाहलों ॥४॥

ऋषि म्हणे गा सोमकांता । आम्रभस्मावरी पुण्य आतां ।

संकल्पोनि सोड तत्वता । तेणें तरुअ वाढेल पैं ॥५॥

ऐसें मुनीचें वचन ऐकून । राजा करीं घेवोनि जीवन ।

पुराण श्रवण पुण्य संकल्पून । देत टांकून भस्मावरी ॥६॥

आम्रभस्मी पडतां जीवन । तरु विस्तारला टवटवोन ।

जाहला पक्व फल सम्पन्न । भूप पाहून संतोषला ॥७॥

मृततरु संजीवन । होता राजा सुलक्षण ।

जाहला देहें देदीप्यमान । परिमळ वाहे शरिराचा ॥८॥

कोटिचंद्र तेजागळा । राजा तेव्हां दिसूं लागला ।

ऋषी म्हणे भूपतीला । सिद्धी तुजला जाहली ॥९॥

राजा म्हणे मुनीश्वरा । कोण वर्णिता तुझे उपकारा ।

त्वत्कृपेनें जन्मसारा । पावलो खरा सार्थकाशी ॥१०॥

माझा देह नवा ऐसा । तूंच केलास दिव्य जैसा ।

दुरितरोग वैद्यसा । दुसरा कोठें न देखों ॥११॥

ऐकोन त्याची विनयवाणी । ऋषी तोषला अंतःकरणीं ।

गौरवोनि सांगे तयालागुनी । जावें सदनीं समारंभें ॥१२॥

ऐसें बोले ऋषि वचन । तंव पातलें दिव्यविमान ।

नृत्य करिती अप्सरागण । घंटा वाजती मंजूळस्वरें ॥१३॥

सूर्यकोटी तेज ज्याचें । गण आरुढले विनायकाचे ।

पाहतां चित्त तोषलें भृगूचें । सोमकांतासि दावीत तो ॥१४॥

राजा म्हणे महामुनी । विमानवार्ता ऐकिल्या कानीं ।

त्या आज प्रत्यक्ष नयनीं । मजलागुनि दिसताती ॥१५॥

तंव पातलें विमान । खालीं उतरले गणेशगण ।

चतुर्भुज सुलक्षण । किरीटकुंडलें मंडित जे ॥१६॥

दिव्य कांसे पीतांबर । किरीटकुंडलें मंडित वर ।

करोनि भूपास नमस्कार । मधुरोत्तरें बोलती ॥१७॥

गण म्हणती भूपमंडणा । परात्पर देवें धाडिलें विमाना ।

चला बैसोनि त्याचे दर्शना । भवबंधना तोडील तो ॥१८॥

ऐकोनि राजा ऐसी गोष्टी । सद्गदित जाहला कंठीं ।

पुलकीत जाहली देहयष्टी । बोले गोमटी करी स्तुती ॥१९॥

सच्चिदानंद परात्पर । सर्वेश तो वेदसार ।

भक्तानुकंपी सर्वेश्वर । लंबोदर जगदात्मा ॥२०॥

तेणें पाठविलें मला विमान । याहून पाहिजे कोणता मान ।

भाग्यशाली मत्समान । नाहीं नाहीं जगामध्यें ॥२१॥

करोनि राजा ऋषीस नमन । तयासि बोले सद्गदवचन ।

परोपकारी तुजसमान । नाहीं नाहीं भूलोकीं ॥२२॥

आतां मातें आज्ञा द्यावी । माझी आठवण हृदयीं असावी ।

ऋषि म्हणे तूंच ठेवावी । जगत्पतीचे सन्निध पैं ॥२३॥

ऋषि विमानास नमस्कार । करुनियां भूपेश्वर ।

आंत आरुढला सत्वर । दारा प्रधानासमवेत पैं ॥२४॥

विमान निघालें लागवेगीं । पुत्रस्नेहें कोमलांगी ।

सुधर्मा विनवी राजयालागीं । मजलागी आतां पुत्र भेटवी ॥२५॥

पुत्रस्नेहें करी रुदन । पाहून द्रवले गणेशगण ।

सौराष्ट्रदेशीं त्याहीं विमान । क्षणामाजी आणिलें पैं ॥२६॥

सुबल आणि ज्ञानगम्ययातें । रायें पाठविले नगरातें ।

ते येऊनि हेमकंठातें । राजसुतातें सांगती ॥२७॥

विमानारुढ गणेशदर्शना । राजा चालला राजनंदना ।

ऐकतां प्रधानाचे वचना । प्रमोद मना जाहला ॥२८॥

प्रजादारांसमवेत । दर्शनास गेला राजसुत ।

भूपतीसि करोनि दंडवत । रुदन करी बहुसाल ॥२९॥

प्रजा रडती दीनस्वरें । आम्हासि टांकून जासी कसा रे ।

पाहतां प्रजांचा भाव सारे । दूत करिती महदाश्चर्य ॥३०॥

हेमकंठ प्रजांसहित । दुःखोदधीमध्यें बुडत ।

रडूं लागला सोमकांत । दारे समवेत तेधवां ॥३१॥

दूत द्रवले कृपाघन । राजयासि बोलती वचन ।

धन्य भाविक प्रजाजन । तुझा नंदन तैसाच पैं ॥३२॥

पुराणश्रवणाचें अखिल सुकृत । उदकें संकल्पोनि यांचे करांत ।

घाला आतां तेणें समस्त । कर्मविमुक्त होतील पैं ॥३३॥

सर्व प्रजा पुत्रासहित । राजा बैसे विमानांत ।

ऐसें ऐकोनि सोमकांत । संकल्पीत पुण्य तेव्हां ॥३४॥

पुत्रासमवेत प्रजा करीं । रायें सोडिलें जेव्हां वारी ।

सर्व मुक्तीचे अधिकारी । विमानावरी आरुढले ॥३५॥

ललनापुत्र सुहृज्जन । सपुत्रपौत्र प्रजा घेऊन ।

राजा निघे वेगेंकरुन । प्रमोदघन तेधवां ॥३६॥

ज्यांचें संसारीं गुंतलें मन । त्याही नाहीं घेतलें जीवन ।

ते राहिले प्रजानन । वरी विमान चालले पैं ॥३७॥

जयजय मयूरेश मयूरेश । जयजय रे तूं त्रैलोक्येश ।

तोडला तूं आमचा भवपाश । जयजय सर्वेश जगत्पती ॥३८॥

सकल लोकांसहित । भजन तेव्हां राजा करित ।

विमान चाले नादभरित । दिशा समस्त कोंदल्या ॥३९॥

विनायकलोकीं विमान । गेलें तेव्हां वेगेंकरुन ।

प्रजासह भूपमंडण । खालीं उतरोन चालती पदीं ॥४०॥

आनंदघन सिंहासनीं । अंकीं ललना शोभती दोन्ही ।

राजा सरुपता पाउनी । घाली चरणी दंडवत ॥४१॥

जयजयकारें करोन नमन । सर्वीं पाहिला गजानन ।

तेथें राहिले आनंदघन । भवनिकेतन सोडोनियां ॥४२॥

सुत सांगे शौनकाशी । रायें ऐकितां पुराणाशी ।

प्रजासह गणेशलोकाशी । पुण्यराशी गेला तो ॥४३॥

पुराण श्रवणाचें सुकृत । याचें शेषास नोहे गणित ।

श्रवणकर्ता पुरुष त्वरित । मुक्तिभुक्ती पावेल पैं ॥४४॥

कुरुक्षेत्री सहस्त्रभार । सुवर्णदानें करी नर ।

त्याहून जो श्रवणीं सादर । पुण्यतर अत्यंत तो ॥४५॥

कोटिकन्या धेनूदान । त्याहून अधिक याचें महिमान ।

किती सांगूं तुम्हांलागुन । कोटि यज्ञाहून अधिक पैं ॥४६॥

याचें करिता श्रवणपठण । त्याचें तुटे जन्ममरण ।

मुक्तिलागीं हेंच कारण । पुराण आहे निश्चयें ॥४७॥

श्रोते परिसा पुढें आतां । पुढील अध्यायीं विशेष कथा ।

ग्रंथफल निरुपणता । जी एकदंता मान्य असे ॥४८॥

जयजयाजी विश्वपती । सिंदूरभूषणा गणपती ।

तूतें स्मरतां महामती । होते चित्तीं तुष्टी सदां ॥४९॥

स्वस्तिश्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराण संमत ।

क्रीडाखंड रसभरित । त्रयस्त्रिंशोध्याय गोड हा ॥५०॥

अध्याय॥३३॥ओव्या॥५०॥

अध्याय तेहतिसावा समाप्त