महाराष्ट्रातील संत परंपरा

महाराष्ट्राची संतांची भूमि म्हणून ओळख आहे. वारकरी पंथाच्या संतानी समाजातील विषमतेवर आपल्या अभंगातून प्रहार केले. संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत सावता माळी, संत तुकाराम, संत एकनाथ, संत गोरा कुंभार आदि विविध जातिधर्मातील संतानी या पंथाचा प्रसार महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर केला. अशा आपल्या समृद्ध संत परंपरेबद्दल माहिती मिळवण्यासाठी हे एक छोटेसे पुस्तक उपलब्ध केले आहे.


संत एकनाथ

‘ज्ञानेश्र्वरी’ ची प्रत शुद्ध करण्यासह, उच्च दर्जाचे विपुल साहित्य निर्माण करणारे संत कवी आणि ‘भारुडांतून’ रंजनासह समाजाचे प्रबोधन करणारे समाजसुधारक!

शांतीब्रह्म, ‘संत’ पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषणांसह ’ज्ञानाचा एका’ या बिरुदावलीने सार्‍या महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संत एकनाथ! आदर्श गृहस्थाश्रमी, मायमराठीचे सुपुत्र, व्युत्पन्नमति पंडित, दयेचा सागर या शब्दांतही त्यांचे वर्णन करता येईल.

यांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे त्यांचे पणजोबा. यांचे कुलदैवत सूर्यनारायण होते. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. एकनाथांचा जन्म शके १४५० ते १४५५ या दरम्यान झाल्याचे मानले जाते. दुर्दैवाने त्यांना आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक‘पाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. एकनाथांना लहानपणापासून अध्यात्म ज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती.

एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दन स्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते महान दत्तोपासक होते. सद्गुरू म्हणून संत एकनाथांनी यांना मनोमनी वरले होते. जनार्दनपंत हे विद्वान व सत्शील आचरणाचे होते. नाथांनी अथक परिश्रम करून गुरुसेवा केली. साक्षात् दत्तात्रयांनी त्यांना दर्शन दिले. आत्मबोध, पूर्णगुरुकृपा, आणि भगवंत दत्तात्रय यांचे दर्शन यांमुळे नाथांचे जीवन धन्य झाले. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या.

नाथांनी सद्गुणी, सुलक्षणी मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती. तिचे सासरचे नाव गिरीजा होते. त्यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा होता. त्यांचा मुलगा हरिपंडित या नावाने प्र‘यात होता, परंपरेचा अतिशय अभिमानी होता. कवी मुक्तेश्र्वर हे नाथांचे नातू होत.

संत ज्ञानेश्र्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी नाथांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. यवनांचे राज्य होते. याच दरम्यान विजयनगरचे हिंदू साम्राज्य बुडाले होते. संपूर्ण समाज कर्तव्यच्यूत झालेला होता. स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वराज्य यांविषयी सर्वत्र अज्ञानाचे वातावरण होते. कर्मकांड, कर्मठपणा यावर जास्त भर होता. भर दिवसा स्त्रिया बाटविल्या जात होत्या. धर्मावर अत्याचार होत होता. अशा बिकट समयी नाथांनी समाज सुधारण्यासाठी जगदंबेला साद घातली. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. रंजन व प्रबोधन करत अध:पतित समाजाला त्यांनी सन्मार्गावर आणले, महाराष्ट्राचा पुरुषार्थ जागविला. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वत:चा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे.

अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन त्यांनी केले. ’एकनाथी भागवत’ हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. एकूण १३६७ श्र्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. हे अतिशय प्रासादिक (व्यासकृत) काव्य आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. त्यांचे रुक्मिणीस्वयंवर अत्यंत लोकप्रिय होते. नाथांची दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) प्रसिद्ध आहे. या महात्म्याने विपुल वाङ्मय निर्माण करून मराठी भाषा समृद्ध केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजेज्ञानेश्र्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते.

एका जनार्दनी सोपा। विठ्ठलनाम मंत्र जपा।।
असा साधा-सरळ संदेश त्यांनी आपल्याला दिला आहे.

फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (इ.स.१५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला.