भूपाळी

भूपाळी हा मराठी पारंपरिक संगीतप्रकार आहे. देवाला पहाटे जागे करण्यासाठी भूपाळी गाण्याची महाराष्ट्रात सांस्कृतिक परंपरा आहे. सहसा भुपाळ्या भूप रागात बांधलेल्या असतात.


गणपतीची भूपाळी

उठा उठा हो सकळिक ।
वाचे स्मरावा गजमुख ।
ऋध्दि-सिध्दिचा नायक ।
सुखदायक भक्तांसी ॥ ध्रु. ॥

अगीं शेंदुराची उटी ।
मथां शोभतसे कीरिटी ।
केशरकस्तुरी लल्लाटीं ।
हार कंठी साजिरा ॥ १ ॥

कानी कुंडलाची प्रभा ।
चंद्र-सूर्य जैसे नभा ।
माजीं नागबंद शोभा ।
स्मरतां उभा जवळी तो ॥ २ ॥

कांसे पितांबराची धटी ।
हाती मोदकांची वाटी ।
रामानंद स्मरता कंठी ।
तो संकटी पावतो ॥ ३ ॥