भूपाळी

भूपाळी हा मराठी पारंपरिक संगीतप्रकार आहे. देवाला पहाटे जागे करण्यासाठी भूपाळी गाण्याची महाराष्ट्रात सांस्कृतिक परंपरा आहे. सहसा भुपाळ्या भूप रागात बांधलेल्या असतात.


रामाची भूपाळी

उठोनियां प्रातःकाळी ।
जपा रामनामावळी ।
स्वयें ध्यातो चंद्रमौळी ।
शैलबाळीसमवेत ॥ ध्रु. ॥

राम योग्यांचें मंडण ।
राम भक्तांचे भूषण ।
राम धर्मांचें रक्षण ।
संरक्षण दसांचे ॥ १ ॥

रामे तटका मारिली ।
रामें शिळा उध्दरिली ।
रामे जानकी पर्णिली ।
गणिका केली ते मुक्त ॥ २ ॥

रामें पाषाण तारिले ।
रामें दैत्य संहारिले ।
रामें बंदी सोडविले ।
मुक्त केले सुरवर ॥ ३ ॥

रामें रक्षीलें भक्तांसी ।
रामें सोडविलें देवांसी |
रामदासाचे मानसीं ।
रामदासीं आनंद ॥ ४ ॥